Kolhapur Ambabai Temple 
कोल्हापूर

Navratri festival : आदिशक्तीच्या जयघोषात नवरात्रौत्सव पर्व सुरू

तोफेच्या सलामीने उत्सवाचा प्रारंभ; पहिल्या दिवशी दीड लाख भाविक अंबाबाई चरणी; फुलांची सजावट, विद्युत रोषणाईने मंदिर उजळले

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मंगलमय वातावरण... फुलांच्या सजावटीने दरवळलेला मंदिर परिसर... घंटानाद, मंत्रोच्चार आणि शिवकालीन तोफेच्या सलामीने दुमदुमलेली करवीरनगरी... ‘उदं गं अंबे उदं...’च्या जयघोषात आदिशक्ती करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सव पर्वाला रविवारी प्रारंभ झाला.

घटस्थापनेच्या मंगलक्षणी अंबाबाईच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली. भक्ती, श्रद्धा आणि मांगल्याच्या या सोहळ्यात पहिल्याच दिवशी रात्री अकरा वाजेपर्यंत सुमारे दीड लाख भाविकांनी देवीच्या चरणी माथा टेकविला. फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईने उजळलेले मंदिर, भक्तिरसात न्हाऊन निघालेली करवीरनगरी आणि देवीच्या जयघोषाने भारलेले वातावरण, यामुळे नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसाला विशेष रंगत आली. पहाटे घंटानाद आणि काकड आरतीने मंदिरातील धार्मिक विधींना सुरुवात झाली. घटस्थापनेनंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या.

पहिल्या दिवशी कलशाच्या आकारात फुलांनी सजवलेली पालखी पारंपरिक लवाजम्यासह मंदिर परिसरातून बाहेर पडली. पालखीतील उत्सवमूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. ‘उदं गं अंबे उदं...’च्या गजरात पालखीवर फुलांची उधळण केली गेली. नेत्रदीपक आतषबाजी व मानाच्या भाविणींनी सादर केलेल्या देवीगीतांनी रंगत वाढविली.

शिवकालीन प्रथा परंपरेनुसार तोफेच्या सलामीने उत्सवाच्या प्रारंभाला पारंपरिक वैभवाची जोड मिळाली. यंदाच्या नवरात्रौत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सुवर्णकळस बसवल्यानंतरचा हा पहिलाच शारदीय नवरात्रौत्सव आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मंदिराच्या आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT