कोल्हापूर ः करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात मंदिर विकास प्रकल्पांतर्गत सुरू असणाऱ्या संवर्धन कामांमुळे गाभाऱ्यातील अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन शनिवार (दि. 14) पासून बंद आहे. या कालावधीत भाविकांना उत्सवमूर्तीसह कलश दर्शनाची व्यवस्था पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आली आहे.
अंबाबाई मंदिर विकास प्रकल्पांतर्गत परिसरात विविध जतन-संवर्धन-संरक्षणाची कामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात मंदिरातील विविध भागांतील दगडी फरशीचे काम होणार आहे. मंदिरातील मुख्य पेटी चौक आणि गाभाऱ्यातील दगडी फरशीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यातून मंदिर आतून अधिक सुरक्षित आणि सुबक करण्याचा उद्देश आहे. या कामाच्या चार दिवसांच्या कालावधीत गाभाऱ्यातील अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन पूर्णवेळ बंद करण्यात आले आहे.
गाभारा जतन व संवर्धनाची मोहीम
पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील महाकाली, महालक्ष्मी, अंबाबाई व महासरस्वती या तिन्ही देवींच्या गर्भगृहांच्या अंतर्गत व बाह्य भागांचे जतन, सँड ब्लास्टिंग, वॉशिंग आणि दगडी फरशी, भिंतींचे नूतनीकरण यासारखी कामे सुरू आहेत. या तंत्रज्ञानामुळे दगडी भिंतींना पडलेल्या भेगा आणि चिरा भरून घेऊन बांधकाम अधिक भक्कम करण्याचा हेतू आहे.