कोल्हापूर : ढगाळ वातावरण नसल्यास करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात पूर्ण क्षमेतेने किरणोत्सव होईल, अशी माहिती खगोल अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिली. दक्षिणायन किरणोत्सवाच्या दोन दिवस आधी म्हणजेच शनिवारी मंदिरात सूर्यकिरणांची विशेष पूर्वचाचणी घेण्यात आली. सूर्यकिरणे योग्य दिशेने आणि अपेक्षित ठिकाणी प्रवेश करत आहेत की नाही, हे तपासण्यासाठी प्रतिवर्षी ही चाचणी घेतली जाते.
किरणोत्सव चाचणीत सूर्यकिरणांच्या प्रवेश मार्गात झाडे, इमारती किंवा अन्य कोणते अडथळे येत आहेत का, तसेच किरणांची तीव्रता आणि त्यांचा कोन अपेक्षेप्रमाणे आहे का, याचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. याशिवाय मंदिराबाहेरील वातावरण, ढगांची स्थिती, धुके, धूळ आणि दृश्यमानता यांचाही अभ्यासही करण्यात आला.
सूर्याची खगोलीय स्थिती, किरणांची दिशा, मंदिराची वास्तुरचना आणि वातावरणातील बदल या सर्व बाबींचा एकत्रित विचार यावेळी करण्यात आला. यामुळे किरणोत्सवाच्या दिवशी सूर्यकिरणांची घटना अपेक्षित वेळेत आणि योग्य प्रकारे घडण्यासाठी आवश्यक परिस्थिती आहे का, याची पूर्वकल्पना आली.