कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यानुसार मंत्रिमंडळात ठरलेल्या बदलांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करा, आपण त्यावर स्वाक्षरी करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी त्यांनी प्रमुख विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.
जिल्ह्यात सर्किट बेंच स्थापन झाले असून, ऐतिहासिक स्थळे आणि मंदिरांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. यामुळे जिल्ह्याची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि भविष्यद़ृष्टी ठेवून करा, असे सांगत विकास प्रकल्पांना आवश्यक निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
पवार म्हणाले, मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्या. किरणोत्सव प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ देऊ नका. मंदिराची कामे करताना नैसर्गिक दगडांचा वापर करा. जागेचे अधिग्रहण करताना लोकांना पूर्वीपेक्षा चांगल्या सुविधा आणि घरे मिळतील, यासाठी नियोजन करा. महापालिका इमारतीच्या चांगल्या डिझाईनसाठी स्पर्धा घ्या. कोल्हापूर भविष्यात आयटी हब बनू शकते, यामुळे विस्तारासाठी पुरेशा जागेची तपासणी करा. आमदारांनी सुचवलेल्या इतर जागांबाबत अंतिम निर्णय घेऊन प्रस्ताव द्या, असे पवार यांनी सांगितले.
यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खा. धैर्यशील माने, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. अमल महाडिक, आ. चंद्रदीप नरके, आ. राहुल आवाडे, आ. शिवाजी पाटील, माजी आ. राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कोल्हापूरच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी चेतना संस्थेच्या विशेष मुलांनी स्वत: तयार केलेली गणेशमूर्ती पवार यांना भेट दिली.
बैठकीला जाताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत उगवलेल्या झुडप पाहताच पवार यांनी ही झाडे काढून टाका, हे देखील आम्ही सांगायचे का? असे सांगत बैठकीत बोलताना यापुढे असे काही दिसले तर कारवाईच करू, असा सार्वजनिक बांधकामच्या अधिकार्यांना दम भरला.
यानंतर बैठकीत माहिती देताना एक अधिकारी थोडा घाबरला, त्यावर घाबरू नका, मी काही मारणार नाही तुम्हाला, असे पवार म्हणाले. प्रशासकीय इमारतीचे बांधकाम बघायला मी पुन्हा येणार आहे, त्यावेळी जर काही निकृष्ट आढळले, तर निलंबितच करणार.
कोल्हापूरकरांनी सोडलेले पाणी आम्हाला प्यायला लागते, असे इचलकरंजीच्या आमदार आवाडे यांनी सांगताच, दूषित पाणी पिऊनही किती सद़ृढ आहात बघा, असा मिश्कील टोला लगावत याबाबत बैठकीचे आश्वासन दिले. बैठक लांबली, त्यावर सकाळी आपल्याला लवकर बोलावले असते तरी मी आलो असतो, असेही पवार म्हणाले.