हसन मुश्रीफ File Photo
कोल्हापूर

Kolhapur Politics : भाजप-राष्ट्रवादीतील संघर्ष उघड

जि. प. मधील यशामुळे मंत्री मुश्रीफ यांना रोखण्याची रणनीती

पुढारी वृत्तसेवा

धीरज बरगे

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (गोकुळ) महायुती म्हणून ‌‘हम सब एक है‌’ असे भासवले जात असले, तरी वास्तव वेगळेच आहे. गोकुळच्या राजकारणात सध्याच्या घडामोडींमधून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष उघड झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या यशाची किनार या संघर्षाला आहे. त्यामुळे गोकुळमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपने रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अवसायनातील 1200 दूध संस्थांवरून गोकुळचे राजकारण तापले आहे. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री मुश्रीफ गोकुळचा पैसा भाजप संपविण्यासाठी वापरत असल्याचा गंभीर आरोप केला. त्याला चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी आमदार पाटील यांना काही शंका असतील, तर त्यांनी वेळ द्यावी, त्यांच्या आरोपांची उत्तरे देऊ, असे प्रतिआव्हान दिले. यामधून महायुतीमध्येच उफाळलेला वाद समोर आला आहे.

गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संचालक सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत; मात्र काँगेसचे आमदार सतेज पाटील आणि भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी त्यांना अद्याप वेळ दिलेली नाही. तसेच सध्याच्या कुरघुड्या पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता फार धूसर आहे. गोकुळमध्ये भाजप-राष्ट्रवादीत सुरू असलेल्या वादापासून काँग््रेास व शिवसेना शिंदे गट अलिप्त आहे. ते आताच्या घडामोंडीवर लक्ष ठेवून आहेत. निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

महाडिक गट, जनसुराज्यच्या पडद्यामागून हालचाली?

मंत्री मुश्रीफ, आमदार पाटील यांच्यामधील वादात महाडिक गट आणि जनसुराज्य शक्ती पक्ष थेट उतरलेला नाही; मात्र त्यांच्या पडद्यामागून हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. दोन अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीनंतर तेथे आलेले शाहूवाडीचे सहायक निबंधक हे भाजपच्या सहयोगी पक्षासोबत जवळीक असणारे आहेत, अशी चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT