करवीरनिवासिनी अंबाबाईची पालखी विसावणार नव्या गरुड मंडपात 
कोल्हापूर

Ambabai Temple| करवीरनिवासिनी अंबाबाईची पालखी विसावणार नव्या गरुड मंडपात

छत उभारणी पूर्णत्वाच्या मार्गावर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील ऐतिहासिक नऊ खणी व तीन आसनी गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. छत उभारणी आणि कडीपाटाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून येत्या दोन दिवसांत नवरात्रौत्सवासाठी गरुड मंडप खुला होणार आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रौत्सवात अंबाबाईची पालखी नव्या गरुड मंडपात विसावणार आहे. सदरेवर उत्सवमूर्तीसाठी आसनाची तयारीही सुरू आहे.

गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. ऐतिहासिक वास्तूचे स्थापत्यवैशिष्ट्य आणि धार्मिक महत्त्व जपत हे काम करण्यात येत आहे. मंडपासाठी देवस्थान समितीच्या गंगाजळीतून १२ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. खांबांची उभारणी, मोजमाप, चौथरा आणि त्यानंतर छताची रचना अशा टप्प्यांतून हे काम केले आहे. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली अंबाबाई मंदिर संवर्धन व जतन देखरेख समितीच्या उपस्थितीत कामाची पाहणी करून नवरात्रौत्सवापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

तीनदा माप चुकले; अखेर चौथ्यावेळी योग्य माप

गरुड मंडपासाठी तयार करण्यात येणाऱ्या आठ खांबांच्या मापाचा प्रश्न कामातील मोठा अडथळा ठरला. खांबांचे माप तीन वेळा चुकल्याने ते नव्याने तयार करण्याची वेळ आली. त्यामुळे कामाला विलंब झाला आणि जवळपास अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा लाकूड मागवून आठही खांब नव्याने तयार करण्यात आले. अखेर चौथ्यांदा खांबांना योग्य माप मिळाले असून, आता हे खांब मंडपाच्या उभारणीत बसविण्यात आले आहेत.

पालखी, धार्मिक विधींसाठी मंडपाचा वापर

अंबाबाईची पालखी विसावणे, उत्सवमूर्ती ठेवणे तसेच नवरात्रातील काही धार्मिक विधींची तयारी करण्यासाठी मंडपाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे ऐतिहासिक गरुड मंडपाचा नवरात्रोत्सवात नव्या स्वरूपात वापर होणार असल्याने भाविकांमध्ये उत्सुकता आणि समाधान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT