कोल्हापूर: हेमाडपंथी बांधकामातील पश्चिमाभिमुख अंबाबाई मंदिराच्या गर्भकुडीपर्यंत अस्ताला जाणारा सूर्य वर्षातून दोन वेळा सलग तीन दिवस किरणोत्सवाची परिक्रमा करतो. अस्ताला जाणार्या सूर्याची थेट किरणे देवीच्या चरण, कंबर व मुखावर नैसर्गिकरीत्या पडण्याचा किरणोत्सव सोहळा अंबाबाई मंदिरात होतो. साहजिकच किरणोत्सवामुळे कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराला जगभरात वैशिष्ट्यपूर्ण मंदिर अशी ओळख मिळाली आहे. यंदा 9 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत दक्षिणायन होत आहे.
वर्षातून दोनवेळा सहा दिवस अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाची पर्वणी अनुभवता येते. दक्षिणायन आणि उत्तरायण अशा दोन कालखंडात हा सोहळा होतो. दक्षिणायनच्या परिघात 9 ते 11 नोव्हेंबर तर उत्तरायणच्या काळात 31 जानेवारी व 1 ते 2 फेब—ुवारी असा हा किरणोत्सवाचा अनोखा सोहळा होतो. प्राचीनकाळी अंबाबाई मंदिरात पाच दिवसांचा किरणोत्सव होत असल्याचे दाखले मिळाले. 1946 च्या महापालिकेच्या अहवालात याला दुजोरा मिळाला. 2018 पासून देवस्थानतर्फे पाच दिवसांचा किरणोत्सव साजरा केला जातो.
अंबाबाई मंदिराच्या महाद्वारापासून पश्चिमेकडील किरणोत्सव मार्गात नव्याने झालेली बांधकामे, इमारतींचा वाढीव भाग, विद्युत तारा अशा मानवी अडथळ्यांमुळे मध्यंतरी किरणोत्सवात खंड पडत होता. देवस्थान व महापालिका यांच्या समन्वयातून हे अडथळे काही प्रमाणात दूर करण्यात आले. ढगाळ हवामान, किरणांची कमी प्रखरता या नैसर्गिक अडथळ्यांमुळेही किरणोत्सवात खंड पडला आहे. खगोलशास्त्रातील संशोधकांनी याचे निरीक्षण व संशोधन केले आहे.
अंबाबाई मंदिर हे पश्चिमाभिमुख हेमाडपंथी बांधकामाचा नमुना आहे. दरजा न भरता एकावर एक ठेवलेल्या दगडात या मंदिराची बांधणी केल्याचा उल्लेख आहे. वास्तुकलेचा अनोखा आविष्कार हे किरणोत्सव सोहळ्याचे प्रमुख कारण आहे. मुख्य मंदिरासमोर कालांतराने गरूड मंडपाच्या बांधकामानंतरही किरणोत्सवात खंड पडलेला नाही. गरूड मंडपाची कमान पार करत गणपती चौक, कासव चौक, पितळी उंबरठा, खजिना चौक, गर्भगृह, गर्भकुटी असा प्रवास करून सूर्याची किरणे देवी अंबाबाईच्या संपूर्ण शरीरावर विसावतात.
अंबाबाई मंदिरातील प्राचीन किरणोत्सव सोहळ्याकडे आजच्या पिढीतील तरुण संशोधनाच्या नजरेतून पाहात आहेत. स्वामी विवेकानंद कॉलेजमधील खगोलशास्त्र विभागातील प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांच्या विद्यार्थी टीमने किरणोत्सवाची वेळ आणि ठिकाण याची नोंद ठेवणारे मॉडेल बनवले आहे. यामुळे सूर्यास्तापूर्वी विशिष्ट वेळेत किरणे कोणत्या वेळी कुठल्या ठिकाणी येतात आणि त्यामागचे शास्स्त्रीय निरीक्षण काय आहे याच्या नोंदी या मॉडेलद्वारे टिपल्या जातात.