कोल्हापूर : कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील 158 एकर जागा महापालिकेची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. महापालिका प्रशासनाने या निकालाला धरूनच कारवाई करावी. त्यातून कोणताही मार्ग काढू नये. कुणाच्याही दबावाला बळी पडू नका, धाडस दाखवा... एक इंचही जागा सोडू नका, बेकायदेशीर बांधकामे पाडा, अशी मागणी कोल्हापूर सर्वपक्षीय नागरी कृती समितीने आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे केली. उपमहापौर अक्षय जरग, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ प्रमुख उपस्थित होते.
तोडपाणीची चर्चा जोरात...
कृती समितीने तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामाबाबत आयुक्त डॉ. भारूड यांची भेट घेऊन चर्चा केली. माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, दबक्या आवाजात तोडपाणी होण्याची चर्चा जोरात सुरू आहे. कोणत्याही स्थितीत बेकायदेशीर बांधकामावर कारवाई झालीच पाहिजे. डॉ. भारूड यांनी कोणी काहीही चर्चा करेल, त्यांना आपण थांबवू शकत नाही, असे सांगितले. बाबा पार्टे यांनी नेत्यांचे ऐकू नका. मनपा हद्दीतील जागेत बांधकामांना परवानगी देणार्या उचगाव ग्रामपंचायतीवर कारवाई करा, अशी मागणी केली.
अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळेच...
महापालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केली. अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळेच बेकायदेशीर बांधकामे झाली. अतिक्रमण नियमित करण्याचा प्रयत्न करू नये, असे अनिल कदम यांनी सांगितले. दिलीप देसाई यांनी सिनिअर कौन्सिल द्यावा, उचगाव ग्रामपंचायतीने महापालिकेचा बुडविलेला कर वसूल करावा, अशी सूचना केली. किशोर घाटगे यांनी कायद्यानुसार कारवाई करावी, असे सांगितले. अशोक भंडारे यांनी बेकायदेशीर बांधकामे पाडून तेथे आरक्षणानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
2013 च्या नोटिसीनुसार कारवाई का केली नाही?
बाबा इंदुलकर म्हणाले, ट्रक टर्मिनस व कचरा डेपोचे काय करणार? फक्त सव्वा कोटी खर्च असतानाही गेल्या 25 वर्षांत महापालिका बजेटमधील निधी देऊन ती आरक्षणे डेव्हलप का केली नाहीत? तसेच बेकायदेशीर बांधकामांना 2013 मध्ये नोटिसा बजावल्या होत्या. त्या नोटिसांच्या आधारे कारवाई का केली नाही? अशी विचारणा केली. महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवा, माजी नगरसेवक रमेश पुरेकर, विजय करजगार, अभिजित कांबळे यांच्यासह इतर उपस्थित होते.
शड्डू मारून थांबणार !
दिलीप देसाई यांनी महापालिका सभागृहात नगरसेवक शड्डू मारून एकमेकांना आव्हाने देत आहेत, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. त्याऐवजी बेकायदेशीर बांधकामे पाडण्यासाठी विशेष सभा घ्यावी, असे आवाहन केले. त्यावर सभागृह नेता मुरलीधर जाधव यांनी कुठल्याही परिस्थितीत अतिक्रमणे पाडणारच, त्यासाठी तावडे हॉटेल परिसरात शड्डू मारून थांबतो, असे सांगितले.