आजरा: पुढारी वृत्तसेवा आजरा शहरात शनिवारी पहाटे आगीने भीषण रौद्ररूप धारण केले. या आगीत ७ चारचाकी वाहनांसह अनेक दुकाने जळून खाक झाली असून, परिसराचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे.
आजरा-आंबोली मार्गावरील पोलीस ठाण्याजवळ असलेल्या 'भाई-भाई चित्रमंदिर' समोरील दुकान गाळ्यांना आज पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. पहाटेची वेळ असल्याने सुरुवातीला ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही, मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर परिसरात मोठे आवाज होऊ लागले. या आवाजामुळे स्थानिक नागरिक जागे झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वाहनांचे नुकसान: ज्या ठिकाणी आग लागली, त्या दुकान गाळ्यांच्या खालच्या मजल्यावर कार रिपेअरिंग गॅरेज होते. आगीची झळ या गॅरेजला बसल्याने तिथे उभा असलेल्या ७ चारचाकी गाड्या पूर्णपणे जळून कोळसा झाल्या आहेत.
व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले: रस्त्याशेजारील महत्त्वाची दुकाने या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दुकानातील साठा आणि फर्निचर पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीचा वेग इतका प्रचंड होता की काही वेळातच सर्वकाही भस्मसात झाले.
सुदैवाने, ही घटना पहाटेच्या वेळी घडल्याने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र आर्थिक फटका मोठा बसला आहे. पोलीस आणि संबंधित विभाग सध्या नुकसानीचा पंचनामा करत आहेत.