अनिल देशमुख
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाने आता नव्या उंचीला गवसणी घातली आहे. कोल्हापूर विमानतळाची झेप आठ लाखांवर गेली आहे. एकेकाळी मोजक्याच प्रवाशांसाठी असलेल्या या विमानतळावरून ये-जा करणार्या प्रवाशांची गर्दी थेट आठ लाखांच्या घरात पोहोचली आहे. ही संख्या केवळ आकडा नाही, तर कोल्हापूरच्या प्रगतीची, व्यापाराच्या वाढीची आणि पर्यटनाच्या वेगाने होणार्या विकासाची साक्ष आहे.
केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत 2018 पासून कोल्हापूर विमानतळावर नियमित प्रवासी हवाई सेवा सुरू यानंतर गेल्या सात वर्षांत विमानसेवांची संख्या, सुविधा आणि कनेक्टिव्हिटी यामध्ये वाढ झाल्याने कोल्हापूर विमानतळ हे आता दक्षिण महाराष्ट्राच्या हवाई दालनाचे केंद्र बनत आहे. मुंबई, हैदराबाद, बंगळूर, अहमदाबाद, नागपूर अशा प्रमुख शहरांशी थेट सेवा उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा ओघ वाढला आहे.
ही वाढती संख्या म्हणजे फक्त तिकीट विक्री नाही, तर कोल्हापूरच्या नव्या ओळखीची खूण आहे. शिक्षण, उद्योग, वैद्यकीय सेवा, पर्यटन या सार्याच क्षेत्रांनी आता आकाशात भरारी घेतली आहे. कोल्हापूर विमानतळावरून एप्रिल 2018 मध्ये केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत कोल्हापूर- मुंबई मार्गावर विमान सेवेला सुरुवात झाली; मात्र ही सेवा अल्पकाळ ठरली. त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये कोल्हापूर-हैदराबाद आणि कोल्हापूर-बंगळूर या मार्गावर सेवा सुरू झाली आणि त्यानंतर कोल्हापूरच्या विमानसेवेने खर्याअर्थाने टेकऑफ घेतले. टप्प्याटप्प्याने गेल्या सात वर्षांत कोल्हापूरच्या विमानसेवा आणि प्रवासी संख्येचा आलेख वाढतच चालला आहे. कोरोना कालावधीमुळे काहीसा परिणाम झाला; मात्र त्यानंतर कोल्हापूरची विमानसेवा झपाट्याने वाढत आहे. जून महिन्यात कोल्हापूर विमानतळाने प्रवासी संख्येचा आठ लाखांचा टप्पा गाठला आहे.
दररोज सेवा
कोल्हापूर- मुंबई
कोल्हापूर - हैदराबाद
कोल्हापूर- बंगळूर
कोल्हापूर - अहमदाबाद
कोल्हापूर - नागपूर
आठवड्यातून चार दिवस सेवा
कोल्हापूर- तिरुपती
कोल्हापूर- हैदराबाद
कोल्हापूर -बंगळूर
आठ मार्गांवर सुरू असलेली विमानसेवा
नवीन टर्मिनल इमारत, विविध तांत्रिक सुविधा
चार राज्यांच्या राजधानीशी जोडलेला हवाई मार्ग