कोल्हापूर : कधीकाळी स्वच्छ हवेसाठी ओळखले जाणारे कोल्हापूर प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहे. मार्च महिन्यात कोल्हापूरमध्ये हवा इतकी खराब होती की, इथे श्वास घेणे म्हणजे दररोज 1-2 सिगारेटस् ओढल्याइतके घातक! धुळीचे लोट आणि भूपृष्ठीय ओझोन प्रदूषणामुळे सिगारेटच्या धुराइतकी हवा धोकादायक बनली आहे. सध्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक अस्थमाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत घातक आहे. या हवेत दीर्घकाळ वावरल्यास श्वसनाच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
एक्यूआय सिगारेट कॅल्क्युलेटरनुसार या श्रेणीतील हवेचा विचार सिगारेटच्या विषारी धुराशी केला तर, एका आठवड्यात 8.4 आणि महिन्याभरात तब्बल 36 सिगारेटस् ओढल्यानंतर जितके नुकसान शरीराला सहन करावा लागेल तितकेच घातक नुकसान या प्रदूषित हवेत वावरल्यामुळे होत आहे.
मार्च महिन्यात कोल्हापूरच्या हवेत सर्वाधिक प्रमाणात आढळलेले प्रदूषक म्हणजे भूपृष्ठ ओझोन. हा गॅस मुळात पृथ्वीच्या वरच्या थरात संरक्षक असतो, पण जमिनीच्या पातळीवर असलेल्या ओझोनमुळे श्वसनाचे गंभीर आजार उद्भवतात. ओझोननंतर पार्टिक्युलेट मॅटर 2.5 आणि पार्टिक्युलेट मॅटर 10 हे सूक्ष्म कणदेखील चिंतेची बाब ठरले आहेत.
कोल्हापुरातील हवेत सातत्याने वावरल्यास मध्यम तीव्रतेची अस्थमासद़ृश लक्षणे दिसू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. शिवाय बराच वेळ बाहेर फिरल्यानंतर अनेकदा घशात घरघर, श्वास घेण्यास त्रास, छातीत जडपणा, सतत खोकला अशी लक्षणे दिसू शकतात. यामुळे अस्थमा असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
एक्यूआय 100 : अस्थमा असलेल्या रुग्णांना श्वसनास त्रास होऊ शकतो.
एक्यूआय 150 ते 200 : अनेकांना सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास जाणवतो.
एक्यूआय 200 पेक्षा जास्त : अस्थमा रुग्णांची लक्षणे तीव्र होऊ शकतात, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांमध्ये.