कोल्हापूर: सध्या कोल्हापुरात उन्हाचा पारा इतका वाढला आहे की, कोल्हापूरकर अक्षरशः घामाघूम झाले आहेत. दुपारी बाराच्या सुमारास शहरात पाय ठेवणे म्हणजे अवघड वाटू लागले आहे. नको रे बाबा ते ऊन! म्हणत अनेकजण घरातच थांबणे पसंत करत असतानाच, एका कल्पक नेटकऱ्याने थेट कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेत कोल्हापूरकरांसाठी चक्क आभासी थंडावा शोधून काढला आहे.
रणरणत्या उन्हाने हैराण झालेल्या या नेटकऱ्याने ‘एआय’ला कोल्हापूर थंड करण्याचा उपाय विचारला आणि ‘एआय’ने क्षणात शहराच्या मुख्य रस्त्यांचे रूपच पालटून टाकले. सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये कोल्हापूरच्या मुख्य रस्त्यांवर दोन्ही बाजूला भलमोठे पंखे आणि त्यातून उडणारे पाण्याचे तुषार दिसत आहेत.
भर उन्हात या पाण्याचे फवारे अंगावर घेत जाणाऱ्या वाहनधारकांचे हे दृश्य पाहून उन्हाने काहिली झालेल्या कोल्हापूरकरांच्या डोळ्यांना एकप्रकारचा थंडावा मिळत आहे.