कोल्हापूर : कोल्हापूर -अहमदाबाद एक्स्प्रेस फेर्या वाढवा, कोल्हापूर-मुंबई मार्गावर वंदे भारत सुरू करा, कोल्हापूर वैभववाडी मार्गाला गती द्या आदी मागण्या खा. धनंजय महाडिक यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आल्या. सांगली कोल्हापूर प्रवासी संघटनेच्या वतीनेही विविध मागण्या करण्यात आल्या. मागण्यांची निवेदने मंगळवारी मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक धर्मवीर मीना यांना देण्यात आले.
खा. महाडिक यांच्यातर्फे दिलेल्या निवेदनात कोल्हापूर-वैभववाडी कोकण रेल्वे प्रकल्प 2016 पासून प्रलंबित आहे. या प्रकल्पाच्या कामास गती शक्ती योजनेअंतर्गत त्वरित सुरुवात करा, अशी मागणी केली आहे. यासह सह्याद्री एक्स्प्रेसचा विस्तार मुंबई पर्यंत करा. कोल्हापूर-मुंबई मार्गावर सहा दिवस चालणारी इंटरसिटी वंदे भारत ट्रेन सुरू करा. कोल्हापूर-सांगली मार्गावर डेमूच्या फेर्या वाढवा. सध्या आठवड्यातून एकदा धावणार्या कोल्हापूर-अहमदाबाद, कोल्हापूर-ह. निजामुद्दीन एक्स्प्रेसच्या फेर्या वाढवा आदी मागण्या करण्यात आल्या.
सांगली-कोल्हापूर रेल्वे प्रवासी संघटनेने दिलेल्या निवेदनात कोल्हापूर, सांगली व कोल्हापूर पंढरपूर मार्गावर दर दोन तासाने इमु सुरू करा. सकाळी सुटणार्या सातारा-कोल्हापूर डेमूला पूर्वीप्रमाणे 12 डबे जोडावे. कोल्हापूर व मिरज जंक्शन वरून सुटणार्या सर्व डेमुना महिला आणि प्रथम वर्गाचे डबे सुरू करा. कोल्हापूर मुंबई मार्गावर सुपरफास्ट व कोल्हापूर पुणे मार्गावर इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करा सह्याद्री एक्स्प्रेस पूर्ववत मुंबईपर्यंत करा कोल्हापुरातून कलबुर्गीला जाण्यासाठी सकाळीही गाडी सोडा. कोल्हापूर हैदराबाद या मार्गावर सोलापूरमार्गे गाडी सोडा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, अरिहंत जैन फाऊंडेशनचे जयेश ओसवाल, अनिल कांबळे आदी उपस्थित होते.
प्रवाशांच्या द़ृष्टीने केलेल्या या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक द़ृष्टीने विचार केला जाईल. ज्या ज्या ठिकाणी नव्याने गाडी सुरू करणे शक्य आहे त्या द़ृष्टीने प्रयत्न केले जातील. कोल्हापूर-सोलापूर मार्गावर गाडी सोडण्यासाठी तसेच डेमूच्या बदल्यात जसजसे इमू रेक उपलब्ध होतील तसा त्याचा वापर केला जाईल, असे सरव्यवस्थापक मीना यांनी सांगितले.