कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-अहमदाबाद मार्गावर सोमवारी पुन्हा विमानसेवा सुरू झाली. स्टार एअर कंपनीकडून प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. आठवड्यातून चार दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे. पहिल्याच दिवशी फ्लाईट फुल्ल होती.
जून २०२३ पासून या मार्गावरील इंडिगो कंपनीची सेवा बंद आहे. या मार्गावर आज, सोमवारपासून स्टार एअरकडून सेवा सुरू झाली. सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे चार दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. कोल्हापुरातून सकाळी ११ वाजता टेकऑफ होणार असून, दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी अहमदाबाद येथे लँडिंग होईल. अहमदाबाद येथून दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी टेकऑफ होणार असून, कोल्हापुरात दुपारी २ वाजून १० मिनिटांनी लैंडिंग होणार आहे.
कोल्हापूर विमानतळावर फ्लाईटला वॉटर सॅल्यूट देण्यात आला. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक नंदकुमार गुरव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या विमानसेवेमुळे कोल्हापूर स्थानकावरून आता मुंबई, हैदराबाद, बंगळूर, तिरूपतीसह आता पाचव्या मार्गावर विमानसेवा सुरू झाली आहे.