कोल्हापूर : कोल्हापूर-आमदाबाद, कोल्हापूर-दिल्ली आणि कोल्हापूर- नागपूर एक्स्प्रेसचे प्रत्येकी चार स्लीपर कोचचे (शयनयान डबे) कमी होणार आहेत. या तीनही एक्स्प्रेस नव्या वर्षात एलएचबी कोचसह धावणार आहेत. मात्र स्लीपरचे डबे कमी झाल्याने सामान्य प्रवाशांना मात्र फटका बसणार आहे.
दर मंगळवारी कोल्हापूर-दिल्ली हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस दर शनिवारी कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस आणि दर सोमवार आणि शुक्रवार आठवड्यातून दोन वेळा कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस धावते.
या तीनही एक्स्प्रेसना प्रवाशांची गर्दी आहे. या एक्स्प्रेसचे तिकीट मिळवणे म्हणजे एकप्रकारचे दिव्यच असते. यामुळे या तीनही एक्स्प्रेसची वेटिंग लिस्ट मोठी असते.
प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे या तीनही गाड्या नियमित कराव्यात, अथवा त्यांच्या फेऱ्यात वाढ करावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून या एक्स्प्रेसच्या डब्यांचीच संख्या कमी करण्यात आली आहे. नव्या एलएचबी कोचच्या संरचनेमुळे या तीन एक्स्प्रेसमधील प्रत्येकी सुमारे दीडशेहून अधिक सीटस् कमी होणार आहेत.
कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस व कोल्हापूर हजरत निजामुद्दीन दिल्ली एक्स्प्रेसचे सध्याचे आयसीएफ कोच बदलून दि. 20 जानेवारीपासून या दोन एक्स्प्रेस धावणार आहेत. दि. 24 जानेवारीपासून कोल्हापूर- अहमदाबाद एक्स्प्रेस एलएचबी कोचसह धावणार आहेत.