Admapur Balumama Trust Working President Attacked
कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा ट्रस्टच्या कार्याध्यक्ष यांना खुर्चीतून ओढून काढून शिवीगाळ करत व धमक्या देत धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली. आदमापुरातील २५ ते ३० जणांनी हा प्रकार केल्याचे ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण बाबुराव घोडके (रा. जळली, ता. गडहिंग्लज) यांनी जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे. आपल्याला कामकाज करण्यासाठी पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, देवालयाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे व इतर तिघांजणांना अनेक आरोपाखाली फौजदारी दावा दाखल होऊन अटक झाली होती. त्यात जामिन मंजूर होऊन कामकाज करण्यासाठी दि. १४ डिसेंबररोजी दुपारी १ वाजता आले असता काहींनी ‘तू इथे का आलास, आदमापुरात यायचे नाही, आत्ताच्या आता उठ व बाहेर जा’ असे म्हणत 25 ते 30 जणांनी बाहेर ओढून मारहाण केली.
होडगे हे १९ पैकी १० विरोधी ९ मतांनी कार्याध्यक्ष झाले आहेत. त्यांच्यासह तिघांवर अनेक आरोपाखाली फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. याच काळात मानद अध्यक्ष धैर्यशिल भोसले यांनी आपणच कार्याध्यक्ष आहोत, असा धर्मादायकडे अर्ज देवून होडगे यांना विरोध केला. त्यानंतर उच्च न्यायालयात दादही मागितली. परंतु ती फेटाळण्यात आल्याचे सांगितले.