बेकायदेशीर ४५ स्‍टोन क्रशरवर कारवाईचा बडगा 
कोल्हापूर

Kolhapur News : बेकायदेशीर ४५ स्‍टोन क्रशरवर कारवाईचा बडगा

जयसिंगपूर परिसरातील क्रशर सील, वीजपुरवठा खंडित; तहसीलदार हेळकर यांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जयसिंगपूर शहरालगत असलेल्या संभाजीपूर, धरणगुत्ती, नांदणी व चिपरी गावच्या हद्दीत बेकायदेशीरपणे सुरू असलेले तब्बल ४५ क्रशर तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या पथकाकडून शुक्रवारी अखेर सील करण्यात आले. त्याचबरोबर या क्रशरला सुरू असलेला विद्युत पुरवठाही तोडण्यात आला.

दै.‘पुढारी’ने ‘जयसिंगपूर परिसरातील भरवस्तीत बेकायदेशीर स्टोन क्रशरचा नंगानाच’ या मथळ्याखाली दोन दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केले. या गैरप्रकाराची वृत्तमालिका 'पुढारी'ने सुरू केली असून, 'पुढारी'च्या दणक्याने महसूल विभाग खडबडून जागा झाला अन्‌ तहसीलदारांनी शुक्रवारी कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. येथील क्रशर व्‍यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची सर्वमुखी मागणी जोर धरत आहे.

जयसिंगपूर शहरालगत असलेल्या संभाजीपूर व धरणगुत्तीच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे क्रशर सुरू होते. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. दै. ‘पुढारी’च्या टीमने नागरिकांच्या तक्रारीनंतर बुधवारी ऑन दि स्पॉट पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे क्रशर सुरू असल्याचे तसेच या क्रशरचा धुरळा नागरी वस्तीत पसरत असल्याचे दिसून आले होते. याबाबत गुरुवारी दै. ‘पुढारी’ने ‘जयसिंगपूर परिसरात भरवस्तीत बेकायदेशीर स्टोन क्रशरचा नंगानाच’ तर शुक्रवारी ‘क्रशरच्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचं खोबरं’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केलेे.

ही वृत्तमालिका प्रसिद्ध झाल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली. त्यानंतर शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी मंडल अधिकाऱ्यांना येथील बेकायदेशीर क्रशर सील करून विद्युत पुरवठा तोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार जयसिंगपूरचे मंडल अधिकारी राहुल कोळी व नांदणीचे मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांच्या संयुक्त महसूल पथकाने संभाजीपूर हद्दीतील १२, नांदणी २४, धरणगुत्ती ६ तर चिपरीतील ३ असे एकूण ४५ क्रशर सील करून विद्युत पुरवठा तोडला. दरम्यान, या परिसरातील क्रशरच्या धुळीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हे क्रशर आता कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी होत आहे. या अवैध धंद्यांना आळा बसण्यास सुरुवात झाल्याने आशेचा किरण दिसत आहे.

सायंकाळी चार वाजले की, सुरुंगाचा धूमधडाका

अनेक वर्षांपासून संभाजीपूर व धरणगुत्तीजवळ असलेल्या खणींमध्ये सायंकाळी चार वाजले की, सुरूंग लावून खणीत स्फोट घडविले जातात. या परिसरात रहिवासी झोन आहे. मात्र या सुरुंगाचे स्फोट रात्री ८ पर्यंत सुरूच असतात. त्यामुळे परिसर हादरून घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT