वारणानगर : थांबलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीस मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार पोपट ऊर्फ मार्तंड आत्माराम सकटे (वय 54, रा. मोहरे, ता. पन्हाळा) ठार झाले, तर महिलेसह मुलगा जखमी झाला. अमृतनगर-चिकुर्डे रस्त्यावर वारणा कॅडबरी कारखान्यासमोर शनिवारी रात्री दहाच्या सुमारास अपघात झाला. याची नोंद पेठवडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.
सकटे शनिवारी रात्री कॅडबरी कारखान्यात कामावर जात होते. कोडोली-पाणंद हद्दीत रस्त्याच्या बाजूला ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती. समोरील वाहनाच्या प्रकाशझोतामुळे न दिसल्याने ते ट्रॅक्टर ट्रॉलीस मागून धडकले. त्याचवेळी रस्त्यावरून लहान मुलासह निघालेल्या महिलेलाही दुचाकीचा धक्का लागल्याने ते रस्त्यावर पडले. तिघांना कोडोलीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी सकटे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.