मृत अभिजीत शंभूशेट्टी 
कोल्हापूर

Kolhapur Accident | कब्बडीचे सामने पाहून येताना हावेरीजवळ भीषण अपघात : शिरढोणच्या तरुणाचा अंत

हावेरी येथून कबड्डीचे सामने पाहून परतताना चालकाचा कारवरील ताबा सुटला; दोघे गंभीर जखमी..

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : कर्नाटकातील हावेरीजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी वाहन रस्त्यालगतच्या मुरमाच्या ढिगाऱ्यावर आदळून पलटी झाल्याच्या भीषण अपघातात शिरढोण (ता. शिरोळ) येथील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अभिजीत आदिनाथ शंभूशेट्टी (वय ३३) असे मृताचे नाव आहे. या अपघातात अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हावेरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत शंभूशेट्टी व त्यांचे नातेवाईक कबड्डीचे सामने पाहण्यासाठी हावेरी येथे गेले होते. रात्री सामना संपल्यानंतर ते चारचाकी वाहनातून घरी परतत असताना हावेरीजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. भरधाव वाहन रस्त्यालगत असलेल्या मुरमाच्या ढिगाऱ्यावर जोरात आदळून पलटी झाले. अपघाताची तीव्रता एवढी होती की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

अभिजीत यांना तातडीने हावेरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातातील अन्य दोघांवर उपचार सुरू असून त्यांची नावे समजू शकली नाहीत.

अभिजीत हे इचलकरंजी येथील एका खासगी कंपनीत कामाला होते. शांत, मनमिळावू आणि सर्वांशी आपुलकीने वागणारा तरुण म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात एक मुलगा, लहान मुलगी व परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने शिरढोण गावावर शोककळा पसरली आहे.

चिमुकल्यांचा आधार हरपला!

अभिजीत शंभू शेट्टी यांच्या अपघाती निधनाची वार्ता शिरढोणमध्ये पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. हसतमुख, शांत आणि मनमिळावू स्वभावाच्या अभिजीत यांच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. इचलकरंजी येथे खासगी कंपनीत नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अभिजीत यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या पत्नी व दोन चिमुकल्या मुलांवर मोठे संकट आले आहे. वडिलांच्या निधनाची कल्पनाही नसलेल्या चिमुकल्यांकडे पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT