कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील औरवाड–गणेशवाडी मार्गावर ट्रॅक्टर व मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात शेडशाळ (ता. शिरोळ) येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला. बसाप्पा कांबळे (वय ४५) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हा अपघात रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला.
शेडशाळ येथील बसाप्पा कांबळे हे कामानिमित्त शिरोळ येथे गेले होते. काम आटोपून ते आपल्या मोटारसायकलवरून गावाकडे परतत असताना औरवाड–कवठेगुलंद मार्गावर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बसाप्पा कांबळे यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. ट्रॅक्टर चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. मयत बसाप्पा कांबळे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे कार्यकर्ते होते. त्यांच्या अचानक निधनाने शेडशाळसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.