कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी योगेश भास्कर पाटील (रा. कळंबा क्वार्टर्स) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. संशयित पाटील हा तुरुंगातील वर्ग-1 अधिकारी असून, पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता 13 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
संशयित योगेश पाटील कळंबा मध्यवर्ती कारागृहात तुरुंगाधिकारी म्हणून कार्यरत आहे. पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून डिसेंबर 2021 पासून त्याने शारीरिक संबंध ठेवले होते. परंतु, संशयिताकडून वारंवार त्रास होऊ लागल्याने पीडितेने त्याला नकार दिला. यातून चिडून त्याने पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करून हिणवण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी याच कारणातून संशयित पाटील याने पीडित महिलेला मारहाण करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी तिने जुना राजवाडा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून बलात्कार व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करत योगेश पाटील याला अटक करण्यात आली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता 13 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास उपअधीक्षक मंगेश चव्हाण करीत आहेत.