शिरोली दुमाला; पुढारी वृत्तसेवा : करवीर तालुक्यातील सावर्डे – सडोली दुमाला रस्त्यावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला अडवून चोरट्यांनी गळ्यातील सोन्याचे ५ तोळ्यांचे चिताक लंपास केले. ही घटना आज (दि. ५) पहाटे घडली. या घटनेची करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
इंदुबाई दिनकर मोहिते (वय ६५ ) या नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला गेल्या होत्या. त्यांच्यापासून लांब अंतरावर अन्य महिला पुढे चालत होत्या. एक-दीड किलोमीटरचे अंतर चालून इंदुबाई घरी परत येत असताना सावर्डे-सडोली दुमाला दरम्यान ओढ्यालगतच्या रस्त्याजवळ एक मोटारसायकल थांबली होती. दुसऱ्या एका मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी खाली उतरून इंदुबाई यांच्या तोंडावर रुमाल दाबून दमदाटी केली. त्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न करताच चोरट्याने गळ्यातील चिताक हिसकावून पोबारा केला.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या इंदुबाई यांनी आरडाओरडा केला; पण जवळपास कोणी नव्हते. काही वेळात येणारे जाणारे जमा झाले. तोपर्यंत चोरटे पळून गेले होते. मोहिते कुटुंबीयांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेने ग्रामीण भागातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा :