आजीबाई झाल्या जटामुक्त  
कोल्हापूर

कोल्‍हापूर : साळशीत ९५ वर्षांच्या आजीबाई झाल्या जटामुक्त; ‘अंनिस’ आणि स्थानिक सरपंचांचे प्रयत्न सफल !

निलेश पोतदार

सरूड : चंद्रकांत मुदूगडे साळशी (ता. शाहूवाडी) येथील सोनाबाई महिपती पाटील (वय ९५) या अंधश्रद्धेला मूठमाती देत नुकत्याच जटामुक्त झालेल्या आजीबाईंनी समाजाला भयमुक्त आनंदी जगण्याचा संदेश दिला आहे. अर्थातच, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आघाडीच्या कार्यकर्त्या सीमाताई आणि गीता हसुरकर तसेच स्थानिक लोकनियुक्त सरपंच आनंदा पाटील यांचे संयुक्त प्रयत्न सोनाबाईंच्या डोक्यावर पस्तीस वर्षांपासून अधिराज्य असलेल्या जटांचे निर्मूलन करण्यात सफल ठरलेत.

घडले ते असे, साळशी (ता. शाहूवाडी) गावचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच आनंदा पाटील यांनी अनिस कार्यकर्त्या गीता हसुरकर यांना केलेल्या मोबाईल फोनकॉलद्वारे, गावामध्ये सोनाबाई महिपती पाटील या जटाधारी वयोवृद्ध आजीबाईंना स्वेच्छेने डोक्यावरील जटांचे निर्मूलन करायचे आहे. स्वतः त्या व त्यांचा परिवार आपल्या प्रतीक्षेत आहेत, असा संदेश मिळाला. वास्तविक खूपदा प्रबोधन आटापिटा करूनही जटा निर्मूलन सारख्या कार्यात दबाव आणि अडथळ्यांना तोंड द्यावे लागणाऱ्या हाडाच्या 'अनिस' कार्यकर्त्यांना हा तसा सुखद अनुभवच होता.

दरम्यान काळ, वेळेची जाण ठेवून सीमाताई आणि गीता हसुरकर या दोघी १७ ऑगस्ट रोजी साळशी गावांत तयारीनिशी दाखल झाल्या. त्यांनी सरपंच पाटील यांना सोबत घेत सोनाबाई यांच्या घरी जाऊन जटांचे निर्मूलन केले. याआधीच आजींचे जटा निर्मूलन व्हायला हवे होते, असा उपदेश करीत त्यामागील कारणमीमांसा देखील केली. आत्तापर्यंत साठवर व्यक्तींचे जटा निर्मूलन केल्याचा अभिमान व्यक्त करणाऱ्या हसुरकर, 'शहीद दाभोळकर यांच्या प्रेरणेने हातात घेतलेल्या या सेवावृत कार्यातून मनस्वी आनंद होतो', असेही उदार अंतःकरणाने सांगतात.

भयगंड, अज्ञानातून आणि चुकीच्या समज, गैरसमजातून अघोरी प्रकारात लोकं गुरफटतात आणि नकळतपणे शारीरिक व्याधींना निमंत्रण देतात. यासाठी जनतेला अवतीभोवती डोळसपणा, विवेकजागृती दाखविण्याची आणि त्यातून समाज प्रबोधनाची खरी गरज आहे.
तुम्ही देखील विवेक कार्यात सहभागी व्हा !

जटा निर्मूलनाच्या सेवाकार्यात प्रबोधन करायला आम्ही सदैव तत्परतेने तयार असतो, असे सांगत आपल्या अवतीभोवती जटाधारी व्यक्ती दिसल्यास स्वतः प्रबोधन करून त्यांना जटामुक्त करू शकता. काही कारणाने हे कार्य शक्य होत नसेल तर आमच्यापर्यंत निरोप पोहचवून अनिसच्या सुधारणा आणि विवेक कार्याला हातभार लावू शकता, असे आवाहन देखील सीमाताई आणि गीताताई या दोघींनी केले.

जाटांमागिल खरे कारण काय ?

समाजात दारिद्र्य, दुःख, आर्थिक मागासलेपण यातून वाट्याला आलेली असहाय्यता आणि यातून विनासायास मुक्ती मिळवण्यासाठी किंबहुना उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी जटा (विविध मार्गाने) वाढतात, मुद्दाम वाढविल्या जातात. अशावेळी या अघोरी प्रकारकडे क्रोध, मत्सराने नव्हे तर गांभीर्याने आणि विवेक जागृतीने पहाणे गरजेचे आहे. खूप दिवस केस न विंचरता, अस्वच्छतेमुळे केसांचा गुंता वाढतो, एखादा किडा चिरडणे, रुई सारख्या वनस्पतीचा चीक किंवा चिकट पदार्थ लागल्यामुळे, आणि ही बाब दुर्लक्षित राहिल्यामुळे केसांची जट (केसांची फडी) तयार होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT