कोल्हापूर : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची थकबाकी एकरकमी जमा केल्यास दंडामध्ये 80 टक्के सवलत देण्याची योजना महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केली आहे. घरफाळ्यापाठोपाठ पाणीपट्टी दंडामध्येही पहिल्यांदाच मोठी सवलत मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
15 जानेवारी ते 28 फेब—ुवारीअखेर विलंब आकारामध्ये 80 टक्के, तर 1 ते 31 मार्चअखेर 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. शहर व लगतच्या ग्रामीण भागात महापालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. पाणीपट्टीची थकबाकी मोठ्या प्रमाणावर असल्याने वसुली सुरू आहे. यावर्षी 10 हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या सुमारे 13,502 थकबाकीदारांना पुरवठा विभागाने जप्तीपूर्व नोटिसा लागू केल्या आहेत. धडक मोहीम राबवून पाणीपट्टी न भरलेल्या ग्राहकांचे नळ कनेक्शन खंडित करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखी कठोर कारवाई सुरू आहे.
थकबाकी एकरकमी भरल्यानंतरच पाणीपट्टी व सांडपाणी अधिभार दंडामध्ये सवलत देण्यात येणार आहे. या योजनेची अंतिम मुदत दि. 31 मार्चअखेर आहे. यासाठी सर्व नागरी सुविधा केंद्रांमध्ये व स्पॉट कलेक्शन सिस्टीमद्वारे कार्यालयीन वेळेत व ऑनलाईन सुविधेमार्फत रात्री 11 वाजेपर्यंतच राहणार आहे.