जिल्हा परिषदेच्या खात्यावरील बनावट चेकद्वारे डल्ला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.  File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : 57 कोटींवर डल्ला मारणार्‍यास मदत करणारा कोण?

जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण; पोलिसांसमोर शोध घेण्याचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा
विकास कांबळे

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या खात्यावरील बनावट चेकद्वारे डल्ला मारण्याचा प्रयत्न फसला असला, तरी जिल्हा बँकेच्या धनादेशाचा नंबर आणि त्याचा नमुना देणारा जिल्हा परिषदेतील की जिल्हा बँकेतील, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. चार दिवसांपासून जिल्हा परिषद व जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांमध्ये याबाबत काथ्याकुट सुरू असून यासंदर्भात एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईतील बँकेत हे चेक भरण्यात आल्यामुळे या प्रकरणाचा तपास लावण्याचे पोलिसांपुढेदेखील आव्हान आहे.

जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाची पंधरा ते सोळा खाती आहेत; परंतु त्यापैकी हस्तांतर निधी, अभिकरण, पंचायत समिती व स्वनिधी ही चार खाती महत्त्वाची आहेत. त्यापैकी पंचायत समिती खाते तालुक्यात असते. उर्वरित तीन खाती महत्त्वाची आहेत. त्यामध्ये पहिले हस्तांतर निधीच्या खात्याची जबाबदारी सुफियान मुजावर व स्वनिधीच्या खात्याची जबाबदारी विशाल चव्हाण यांच्याकडे आहे.

वित्त विभागात बँकेचे स्टेटमेंट एक दिवस आड तपासले जाते. त्याप्रमाणे शुक्रवारी कॅशियर विशाल चव्हाण यांनी नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता बँकेचे स्टेटमेंट तपासले. यामध्ये बँकेच्या खात्यावरील 18 कोटी वर्ग झाल्याचे दिसले. एवढ्या मोठ्या रकमेचा चेक अलीकडील काळात कोणाला दिला नसल्यामुळे त्यांनी तत्काळ ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी चेकबुक पाहिले, तर त्या नंबरचा चेक कार्यालयातच होता. त्यामुळे चेक कार्यालयात असताना एवढी मोठी रक्कम खात्यावरून वर्ग झाल्याने अधिकार्‍यांचे धाबे दणाणले. त्यांनी तत्काळ जिल्हा बँकेशी संपर्क साधून पुढील कार्यवाही केली. त्यामुळे धोका टळला असला, तरी या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या कपाटात असलेल्या चेकचे नंबर त्या व्यक्तींना कोणी दिले? चेकचा नमुना त्यांना कोणी पुरविला? पाच लाखांवर रक्कम असलेला चेक क्लीअरिंग करताना रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार चेक क्लीअरिंग करण्यापूर्वी बँकेने ग्राहकांशी संपर्क साधून त्याची खात्री करून घेणे आवश्यक असते; परंतु बँकेने जिल्हा परिषदेशी संपर्क न साधता हा चेक पास कसा केला? जिल्हा बँकेचा मूळ धनादेश आणि बनावट धनादेश बँक कर्मचार्‍यांच्या लक्षात कसा आला नाही, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्हा बँकेच्या चेकबूकचे प्रिटिंग मुंबईमध्ये

जिल्हा बँकेचे तिन्ही चेक सानपाडा व नवी मुंबई येथील आयडीएफसी, आयसीआयसीआय व कोटक महिंद्रा या बँकेत भरण्यात आले आहेत. जिल्हा बँकेच्या वतीने धनादेशाचे प्रिटिंगही मुंबईतून करून घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

खात्यावर अपेक्षित नसताना कोटीत रक्कम आली कोठून

आयडीएफसी बँकेच्या एका खात्यावर 18 कोटींची रक्कम जमा होत असल्याचे पाहून या बँकेला खातेदाराचा संशय आला. या खात्यावर पुरेशी रक्कम नसताना आणि जास्तीत जास्त शिल्लक रक्कम हजाराच्या पटीत असताना अचानक एवढी मोठी कोटीमध्ये रक्कम पाहिल्यानंतर या बँकेने खात्यावरील पुढील व्यवहार थांबविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT