सांगरूळमध्ये ३० एकर ऊस जळून खाक 
कोल्हापूर

Kolhapur Sugarcane Fire : सांगरूळमध्ये ३० एकर ऊस जळून खाक

२५ ते ३० शेतकऱ्यांना लाखोंचा फटका

पुढारी वृत्तसेवा

सांगरूळ : सांगरूळ (ता. करवीर) येथे आगीत तब्बल ३० एकरांतील ऊस जळून खाक झाला. यामध्ये २५ ते ३० शेतकऱ्यांचे सुमारे पंचवीस ते तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाऱ्याच्या वेगामुळे आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले.

सांगरूळ येथील कळंब पाणंद आणि माळ परिसरातील शेतांमध्ये आज दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. महेश वातकर व अन्य शेतकऱ्यांच्या शेतामधून महावितरणच्या शेतीपंपासाठी जाणाऱ्या विद्युत वाहिनी या उसाला घासल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातच वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आगीने क्षणार्धात आसपासच्या उसाच्या फडांना वेढले. बघता बघता सुमारे ३० एकर क्षेत्रांतील ऊस जळून खाक झाला.

आगीची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही शेतकऱ्यांनी नदीकाठावरील शेतीपंप सुरू करून पाण्याचा मारा केला, तर काहींनी ऊस तोडून आगीचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता आणि वाऱ्याचा वेग यामुळे शेतकऱ्यांचे प्रयत्न अपुरे पडले. ऐन ऊस गाळप हंगामाच्या सुरुवातीलाच ही दुर्घटना घडल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. घटनास्थळी तलाठी प्रकाश सूर्यवंशी, सहायक कृषी अधिकारी उमा गुरव, कुंभी कारखान्याचे संचालक राहुल खाडे, विलास आसगावकर यांनी पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT