कोल्हापूर

कोल्हापूर : गर्भलिंग निदानप्रकरणी 16 वर्षांत 22 खटले

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : उमलण्याआधीच कोवळ्या कळ्यांवर घाला घालण्याचे प्रकार कोल्हापुरात वारंवार समोर येत आहेत. मुलगी नको, मुलगाच पाहिजे हा अट्टहास ठेवत जिल्ह्यात आजही गर्भलिंग तपासणी व गर्भपाताचे अवैध धंदे सुरू आहेत. याप्रकरणी जिल्ह्यात गेल्या 16 वर्षांत 22 खटले दाखल झाले आहेत. आरोग्य विभागातील मिलीभगत व आशीर्वाद असल्याने हे धंदे सुरू असल्याचे सांगितले जाते.

गर्भातील मुलींचे मृत्यू रोखण्यासाठी सरकारने गर्भलिंग निदान चाचण्यांवर बंदी घातली आहे. तरी देखील गर्भलिंग चाचण्या सुरूच आहेत. राज्यातील सर्वाधिक कारवाया कोल्हापूरमध्ये होऊनही गर्भलिंग निदान करणार्‍या टोळ्यांना जरब नाही. या टोळ्या केवळ गर्भलिंग निदानापुरत्या मर्यादित नसून गर्भपातही करतात, हे वास्तव आहे. दोषींवर कारवाई होऊनही जिल्ह्यात गर्भलिंग निदानाची अनधिकृत केंद्रे सुरूच आहेत.

हरिओमनगर, अंबाई टँक रंकाळा, पडळ, आमजाई व्हरवडे, मडिलगे, परिते, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर म्हाडा कॉलनी, बांबवडे येथील गर्भलिंग, गर्भपात निदानाची घटना ताजी असतानाच आता कोल्हापूर-आंबेवाडी चिखली रोडवर, भोई गल्ली गल्ली, वरणगे पाडळी, गंगाई लॉन फुलेवाडी, मडिलगे खुर्द येथेही कारवाया झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात गर्भलिंग तपासणी करणार्‍या रॅकेटची पाळेमुळे पोहोचली आहेत. एकेका सोनोग्राफी सेंटरकडे डझन, दोन डझन एजंट कनेक्ट आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने 2008 पासून आतापर्यंत 16 वर्षांत 22 खटले दाखल केले आहेत. पण कारवाई होऊनही हे कारनामा का थांबत नाहीत, असा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे.

पाच वर्षांतील कारवाया

2020 कोडोली (ता. पन्हाळा)
2021 इचलकरंजी, परिते (ता. करवीर)
2022 पडळ (ता. पन्हाळा)
2023 आमजाई व्हरवडे, कसबा वाळवे (ता. राधानगरी)
मडिलगे (ता भुदरगड)
2024 कोल्हापूर शहर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, म्हाडा
कॉलनी, बांबवडे (ता. शाहूवाडी), चिखली रोड, वरणगे
पाडळी, फुलेवाडी, मडिलगे खुर्द (ता. भुदरगड)

SCROLL FOR NEXT