कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एक, दोन नव्हे तर तब्बल चार योजना कार्यान्वित आहेत. परंतु एवढे असूनही जानेवारी 2025 या वर्षातील पहिल्याच महिन्यातील पहिल्या 20 दिवसांत 6 वेळा पाणीपुरवठा बंद करण्याची वेळ आली आहे. कधी पाईपलाईन फुटली, तर कधी वीजवाहिनी तुटली. कधी क्रॉस कनेक्शन कामामुळे पाणीपुरवठा योजना बंद करण्याची वेळ आली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून चार योजना केल्या आहेत. पण एक बंद पडली तर दुसर्या योजनेतील पाणीपुरवठा व्हायला हरकत नाही. तेवढा वेळ आणि पैसाही योजनांवर खर्च झाला आहे. परंतु नियोजनाअभावी या योजनांची स्थिती एक ना धड... अशी झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत.
सर्वात जुनी म्हणून बालिंगा योजनेचा उल्लेख करावा लागेल. आजही या योजनेतून 60 ते 80 एमएलडी पाणी उपसा होतो. शहरातील गावठाण असणार्या सी आणि डी वॉर्डाची तहान याच योजनेवर भागते. या योजनेचे जल शुद्धीकरण केंद्र सर्वात जुने आहे. याच्या डागडुजीवर थोडा खर्च केला तर आणखी काही वर्षे या योजनेचे आयुष्य वाढणार आहे.शिंगणापूर योजना सध्या बंद स्थितीत आहे. नवीन पंप जोडण्याचे काम सुरू आहे. 33 केव्ही लाईनवर चालणारे उपसा केंद्र आहे. त्यामुळे येथील जुने पंप इतरत्र वापरता येणार नाहीत. ई वॉर्डसाठी ही योजना केली आहे. आता 500 एचपीचे तीन पंप बसविण्यात येणार आहेत. ई वॉर्डला या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतर नव्याने केलेल्या थेट पाईप लाईन योजनेचा उल्लेख करावा लागेल. दररोज 180 एमएलडी पाणी उपसा केला जातो. शहरभर या योजनेचे जाळे पसरले आहे. परंतु तरीही पाणी कमी पडते. यामागचे गौडबंगाल काय, असा सवाल उपस्थित केला आहे.
कळंबा योजनेतूनही दरररोज 10 एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. मंगळवार पेठेपासून ते बागल चौकापर्यंत या योजनेचे पाणी नैसर्गिक उताराने जाते. एवढे पाणी असूनही शहरात पाणीपुरवठा विस्कळीत होणे ही योग्य बाब नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन करायला हवे, अशी मागणी होत आहे.
एक योजना बंद झाली की, पर्याय म्हणून लगेच दुसर्या योजनेतून पाणीपुरवठा होऊ लागला तरच पर्यायी म्हणून या योजनांचा वापर होऊ शकतो. सध्या मात्र तसे होताना दिसत नाही. एकाचवेळी सर्वच योजनांची देखभालीची कामे निघतात. मध्येच पाईपलाईन फुटते. त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती पाणीपुरवठा योजनांची झाली आहे.