कोकेन File Photo
कोल्हापूर

Kolhapur News | नागाळा पार्कात २० लाखांचे १३३ ग्रॅम कोकेन जप्त

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरातील नागाळा पार्कमधील जिल्हा परिषद रोडवर एकाला ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी तब्बल 20 लाख रुपये किमतीचे 133 ग्रॅम कोकेन जप्त केले. याप्रकरणी नीलेश राजेंद्र जाधव (40, रा. डी वॉर्ड, जुना बुधवार पेठ) याला अटक करण्यात आली. एलसीबीचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी ही कारवाई केली.

पोलिस निरीक्षक कळमकर, अंमलदार विनायक चौगुले यांना नागाळा पार्कात एक व्यक्ती कोकेन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार 10 ऑक्टोबरला कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे, चौगुले, प्रकाश पाटील, अशोक पोवार, अमित सर्जे, वैभव जाधव, सुरेश पाटील, रूपेश माने, शिवानंद मठपती, अनिल जाधव, सुशील पाटील आदींनी नागाळा पार्कात सापळा लावला. त्याठिकाणी जाधव हा संशयास्पदरीत्या आढळून आला.

मुंबईतून विक्रीसाठी आणले कोकेन

पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडे तब्बल 133 ग्रॅम कोकेन आढळले. त्याची किंमत सुमारे 20 लाख आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता कोकेन हा अमली पदार्थ मुंबईतून विक्री करण्यासाठी आणल्याचे त्याने सांगितले. जाधव याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापुरात कोकेनची पहिलीच कारवाई

शहरात गल्लोगल्ली गांजा विक्री केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी तब्बल 28 किलो गांजा जप्त केला. तसेच काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी चरसही जप्त केले होते. अशाप्रकारे कोल्हापूर आता अमली पदार्थांच्या विक्रीचे केंद्र बनत आहे. कोल्हापुरात पहिल्यांदाच कोकेनची एवढी मोठी कारवाई झाली आहे. एक ग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ तब्बल 15 हजार रुपयांना मिळत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT