कोल्हापूर : सहलीसाठी सोलापूर जिल्ह्यातील कुरनूर (ता. अक्कलकोट) येथून कोल्हापुरात आलेल्या नववी व दहावीतील 13 विद्यार्थ्यांना शुक्रवारी सायंकाळी विषबाधा झाली. भोवळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांनंतर सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कुरनूर येथील नागनाथ विद्या विकास प्रशाळेतील 74 मुले-मुली कोल्हापूर, रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांसह पर्यटन व देवदर्शनासाठी चार दिवसांपूर्वी सहलीवर आले आहेत. गुरुवारी रात्री त्यांचा नाणीज (जि. रत्नागिरी) येथील मठात मुक्काम राहिला. सकाळी नाश्ता व जेवण करून ते कोल्हापुरात दाखल झाले. दिवसभर काही महत्त्वांच्या ठिकाणांची पाहणी करून मुलांनी दुपारी चार वाजता जेवण केले.
एस.टी.मधून पुढील प्रवासाला निघत असतानाच काही मुलींना उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झाला; तर काहींना भोवळ येऊ लागली. शिक्षकांनी त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. सामाजिक कार्यकर्ते गणी आजरेकर, आरोग्यदूत बंटी सावंत यांच्यासह लक्ष्मीपुरी व सीपीआर चौकीतील पोलिसांनी मुलींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. उपचारानंतर सर्वच मुलींची प्रकृती स्थिर झाल्याने रात्री सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला. अचानक घडलेल्या घटनेमुळे मुली भेदरलेल्या अवस्थेत होत्या.
कोल्हापूरकरांचा मदतीचा हात
कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील नागनाथ विद्या विकास प्रशालेचे विद्यार्थी सहलीसाठी आले होते. यामधील काही विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना सीपीआर येथे दाखल केले होते. या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे काम कोल्हापूरकरांनी केले. यामध्ये बंटी सावंत यांनी विद्यार्थ्यांना जेवण, अमोल इसापुरे यांनी पाण्याचे बॉक्स, तर एस.टी. महामंडळाने फूड पॅकेटस् दिले.