कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने 5 शिक्षण विस्तार अधिकारी पदावर, तर 109 मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली. मागील एक वर्षात 550 पदांवर शिक्षकांना बढती देण्यात आली आहे. याबद्दल गुरुवारी पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षण विभागाकडे पुरोगामी शिक्षक संघटनेने वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला होता. तसेच शिक्षणाधिकार्यांची भेट घेऊन तत्काळ प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार संघटनेच्या पाठपुराव्यास यश आले आहे. पदोन्नती प्रक्रियेत विस्तार अधिकारी राधानगरी 2, करवीर 1, गडहिंग्लज 1, भुदरगड 1 व मुख्याध्यापक आजरा 4, भुदरगड 6, चंदगड 12, गडहिंग्लज 2, गगनबावडा 1, हातकणंगले 17, कागल 9, करवीर 19, पन्हाळा 9, राधानगरी 6, शिरोळ 17, शाहूवाडी 7 याप्रमाणे पदोन्नती देण्यात आली आहे.
पदोन्नती प्रक्रियेस मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, उपशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे, उदय सरनाईक, कक्ष अधिकारी सदलगे, अधीक्षक विनय कोचरी यांच्यासह सर्व गट शिक्षणाधिकारी यांचे सहकार्य लाभले.
शिक्षण विभागाने गतिमान प्रशासन राबवत जून 2024 पासून आजपर्यंत शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी तीन, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदे रिक्त होतील तसे पाठोपाठ पाचशेहून अधिक शिक्षकांना पदोन्नती दिली आहे. राज्याच्या तुलनेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.- प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना