कोल्हापूर : जिल्ह्यात डेंग्यूची साथ दिवसेंदिवस वाढत असून, आरोग्य यंत्रणांसमोर आव्हान उभे राहिले आहे. 2017 पासून 2025 (एप्रिल अखेर) पर्यंत एकूण 8,533 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक 4510 रुग्ण तर ग्रामीण भागात 4026 रुग्ण सापडले आहेत. 2023 मध्ये सर्वाधिक 318 रुग्ण हातकणंगले तालुक्यात आढळून आले आहेत. जानेवारी ते 1 जुलै 2025 पर्यंत 104 रुग्ण डेंग्यू बाधित आढळले आहेत. डेंग्यूच्या एकाही रुग्णाचा यावर्षी मृत्यू झाला नसल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाने दिली.
नागरिक पाणी पिऊन प्लास्टिकच्या बाटल्या व प्लास्टिकचा कचरा रस्त्याच्या कडेला टाकतात. त्यामध्ये पावसाचे पाणी साचून डेंग्यू डासांच्या अळ्या झाल्याचे सवेर्र्क्षणात आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकच्या बाटल्या व प्लास्टिक इतरत्र टाकू नये. रिकामी झालेली पाण्याची बाटली व खाऊ खाल्यानंतर झाल्यानंतर प्लास्टिकची योग्य विल्हेवाट लावावी.
डेंग्यूचे विषाणू वाहून नेणार्या एडीस डास प्रामुख्याने साचलेल्या पाण्यात वाढतो. शहरातील व ग्रामीण भागातील अस्वच्छता, प्लास्टिक, कचरा, उघड्या टाक्या आणि डंपिंग ग्राऊंड यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.