Kolhapur Startups | कोल्हापूर १,०१९ स्टार्टअप्स‍सह राज्यात ‘टॉप १०’मध्ये 
कोल्हापूर

Kolhapur Startups | कोल्हापूर १,०१९ स्टार्टअप्स‍सह राज्यात ‘टॉप १०’मध्ये

एआय, एरोस्पेस, रोबोटिक्स, बायोटेक्नॉलॉजीसह अत्याधुनिक क्षेत्रांत भरारी

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : साखर उद्योग, फाऊंड्री, ऑटोमोबाईल घटक आणि वस्त्रोद्योगासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरची आता डीप टेक स्टार्टअप हब म्हणून नवी ओळख निर्माण होत आहे. उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या (डीपीआयआयटी) मान्यतेनुसार जिल्ह्यात १ हजार १९ स्टार्टअप्सची नोंदणी झाली असून त्यामध्ये एरोस्पेस व संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), ग्रीन टेक्नॉलॉजी, संशोधनाधारित उद्योग आणि प्रगत अभियांत्रिकीसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांतील स्टार्टअप्सचा समावेश आहे. कोल्‍हापूर मेट्रो सिटीच्‍या बरोबरीने स्‍टार्टअपच्‍या यादीत ‘टॉप १०’मध्‍ये आले आहे.

टेक क्षेत्रात स्टार्टअप्स उद्योग शेती, आरोग्य, शिक्षण आणि उत्पादन प्रक्रियेसाठी आधुनिक तांत्रिक उपाय विकसित करत आहेत. ग्रीन टेक्नॉलॉजी, नवीकरणीय ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील स्टार्टअप्स शाश्वत विकासावर भर देत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने नुकतीच ‘स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंडस्‌ २.०’ योजना अधिसूचित केली आहे. यासाठी देशभरातील स्टार्टअप्ससाठी १० हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरमधील एआय, एरोस्पेस, रोबोटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, ग्रीन टेक्नॉलॉजी, आयओटी आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातील स्टार्टअप्सनाही भविष्यात या निधीचा लाभ मिळेल.

‘या’ क्षेत्रांत स्टार्टअप्सची झेप

कोल्हापुरात कृषी व अ‍ॅग्रीटेक, आयटी सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता, हेल्थकेअर व लाईफ सायन्सेस, फूड अँड बेव्हरेजेस, नवीकरणीय ऊर्जा, ग्रीन टेक्नॉलॉजी, कचरा व्यवस्थापन, ऑटोमोबाईल, एडटेक, फिनटेक, टेक्नॉलॉजी हार्डवेअर, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, एरोस्पेस व संरक्षण, बायोटेक्नॉलॉजी, केमिकल्स, बांधकाम, लॉजिस्टिक्स, फॅशन, जाहिरात, पर्यटन, स्पोर्टस्‌ मॅनेजमेंट, नॅनोटेक्नॉलॉजी, सोशल इम्पॅक्ट आणि एआर/व्हीआरसारख्या विविध क्षेत्रांतील स्टार्टअप्स कार्यरत आहेत.

डीप टेक म्हणजे मूलभूत विज्ञान, संशोधन आणि प्रगत अभियांत्रिकीत नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे स्टार्टअप्स. हे स्टार्टअप्स केवळ सॉफ्टवेअर किंवा मोबाईल ॲप तयार करत नाहीत, तर कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, एरोस्पेस, बायोटेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्ज, सेमीकंडक्टर, क्वांटम तंत्रज्ञान आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात संशोधनाधारित उत्पादने व उपाय विकसित करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT