कोल्हापूर

कोल्हापूर : व्हिनस कॉर्नरला चाकू हल्ला; पाच जखमी

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : किरकोळ कारणावरून व्हिनस कॉर्नरला दोन गटांत बुधवारी रात्री चाकु हल्ला झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले. उपचारासाठी दाखल झालेले जखमी आमने-सामने आल्याने सीपीआरमध्येही तुफान राडा झाला. सीपीआरच्या अपघात विभागातही हाणामारी झाली. जमावाने काचा फोडल्या. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवले. या घटनेने व्हिनस कॉर्नर, सीपीआर परिसरात उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते. या हाणामारीनंतर रिक्षा, दुचाकींचेही नुकसान झाले. या हल्ल्यात शिवाजी अप्पासाहेब मोरे, वैभव शिवाजी मोरे, आकाश वर्णे (सर्व रा. उत्तरेश्वर पेठ) तर दुसऱ्या गटातील इक्बाल गुडन शेख व गुडन सय्यद शेख (दोघे रा. कदमवाडी) जखमी झाले. दोघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

व्हिनस कॉर्नर परिसरात मोरे यांचे हॉटेल आहे तर त्याजवळच शेख यांची अंडा आम्लेटची हातगाडी आहे. दुचाकी लावण्यावरून या दोघात वाद झाला. वादांचे पर्यवसान हाणामारीत झाले. दरम्यान दोन्ही बाजूंनी चाकूसह हातात मिळेल ते हत्यार घेऊन एकमेकांवर हल्ला चढवला. सुमारे पंधरा मिनिटे ही हाणामारी सुरू होती. काहींनी अंडा आम्लेटच्या  दोन्ही हातगाड्या  उलथवून टाकल्या.

दोन्ही जखमींना सीपीआरच्या अपघात विभागात आणण्यात आले. यावेळी पुन्हा एकमेकांत हाणामारी झाली. यामुळे अपघात विभागातील परिचारिका, डॉक्टर, वॉर्ड बॉयही घाबरले. एकाने विभागातील खाट उचलून जखमीच्या अंगावर टाकला. दरम्यान हल्ल्याची माहिती मिळताच मोरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने सीपीआरमध्ये आले. काहींनी अपघात विभागात घुसण्याचा प्रयत्न केला. काहींनी अपघात विभागाच्या काचा फोडल्या. ही माहिती मिळताच लक्ष्मीपुरीचे पोलिस सीपीआरमध्ये आले. त्यांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. जखमी वैभव आणि शिवाजी मोरे यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

SCROLL FOR NEXT