कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बसथांब्याजवळ शॉर्टसर्किटमुळे केएमटी बसला शुक्रवारी सायंकाळी आग लागली.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

KMT bus fire | शॉर्टसर्किटमुळे केएमटीला आग

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरातील मध्यवर्ती दाभोळकर कॉर्नरसह पादचारी पुलाखालील बसथांब्याच्या परिसराने शुक्रवारी सायंकाळी अंगावर काटा आणणारा थरार अनुभवला. पाचगाव-कदमवाडी ते वळिवडेकडे जाणार्‍या महापालिकेच्या केएमटी बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. क्षणाचाही विलंब न करता चालक-वाहकाने बसमधील 25 ते 30 प्रवाशांना खाली उतरविले. अग्निशमन दलाचे जवानही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

अग्निरोधक सिलिंडरमधील द्रव्याचा फवारा करून इंजिनमधील आग आटोक्यात आणल्याने शहरातील मध्यवर्ती परिसरातील बाका प्रसंग टळला. पाचगाव-कदमवाडी ते वळिवडेकडे जाणारी केएमटीची बस शुक्रवारी साडेपाचला शहरातील मध्यवर्ती दाभोळकर कॉर्नरपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पादचारी पुलाखालील बसथांब्यावर थांबली. त्याचक्षणी बसमधील इंजिनमधून धुराचे लोट येऊ लागले. बसमध्ये 25 ते 30 प्रवासी असताना हा प्रकार घडल्याने चालक विनायक गवळी, वाहक प्रशांत धुमाळ कमालीचे भेदरले. परंतु, प्रसंगावधान राखत चालक-वाहकाने क्षणाचाही विलंब न करता बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविले.

महापालिका अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. शिवाय, बसमधील अग्निरोधक सिलिंडरमधून द्रव्याचा फवारा करून आगीवर नियंत्रणाचा प्रयत्न केला. पाठोपाठ अग्निशमन दलाचे जवानही तडक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील रिक्षाथांब्यावरील चालकांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. रिक्षाचालकांनी तर बाटल्यांमधून पाण्याचा मारा सुरू केला.

अग्निशमन दलाच्या जवानांनीही तत्परता दाखवत अवघ्या दहा मिनिटांत केएमटी बसला लागलेली आग आटोक्यात आणल्यानंतर प्रवाशांसह सार्‍यांनीच मोकळा श्वास घेतला. केएमटीचे नियंत्रक विजय भोसले, उत्तम कांबळे यांच्यासह शाहूपुरी पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. केवळ चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे शहरातील मध्यवर्ती दाभोळकर कॉर्नर परिसरातील संभाव्य दुर्घटना टळली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT