कोल्हापूर

किसान सन्मान योजनेची जबाबदारी आता ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायकांवर

दिनेश चोरगे

हातकणंगले; पोपटराव वाकसे :  अनेक दिवसांपासून बंद असलेल्या किसान सन्मान निधी योजनेची जबाबदारी गावागावांतील ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहायक यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. मूळची कृषी विभागाची असलेली योजना महसूल विभागाने की कृषी विभागाने कार्यान्वित करावयाची या वादात अडकून राहिलेल्या केंद्र शासनाच्या किसान सन्मान निधी योजनेची कार्यवाही लवकरच होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांची ससेहोलपट थांबणार आहे.

शासनाकडून शेतकर्‍यांचा सन्मान करण्यासाठी केंद्र शासनाने किसान सन्मान निधी योजना सुरू केली; परंतु या योजनेबाबत कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून शेतकर्‍यांना खात्रीशीर माहिती दिली जात नसल्याने शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे. प्रधानमंत्री किसान योजनेचे काम कोणी करायचे? यासाठी महसूल व कृषी विभागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. या योजनेची सर्व कामे महसूल विभागाने केली; परंतु या योजनेचा पुरस्कार कृषी आयुक्तांनी स्वीकारला. त्यामुळे महसूल विभागामध्ये नाराजी पसरली आणि त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. या वादाचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सर्व तक्रारींकडे महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले होते. तहसील कार्यालयामध्ये या योजनेच्या चौकशीसाठी गेलेल्या शेतकर्‍यांना महसूल कर्मचारी कृषी कार्यालयाकडे जाण्याचा सल्ला दिला जात होता. या योजनेचे ज्या कर्मचार्‍यांकडे आहे त्या कर्मचार्‍यांकडून शेतकर्‍यांना कोणतीही माहिती दिली जात नव्हती. जबाबदारीने शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले जात नव्हते. अनेक शेतकरी शासकीय कार्यालयात हेलपाटे घालून देखील दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत होता. राजकीय नेते, पदाधिकारी यांनीदेखील याबाबत कधीही गांभीर्याने दखल घेतली नव्हती, आता मात्र या योजनेच्या कामाची जबाबदारीच जिल्हाधिकारी यांनी नुकतीच निश्चित केली आहे.

कृषी विभाग, तलाठी, ग्रामसेवक कर्मचार्‍यांची नावे निश्चित केल्यामुळे या कर्मचार्‍यांना आता कोणतीही पळवाट राहणार नाही. संबंधित शेतकर्‍यांनी संबंधित कर्मचार्‍यांशी संपर्क साधण्याची गरज निर्माण झाली आहे. या योजनेनुसार अल्प व अत्यल्प शेतकर्‍यांना या योजनेंतर्गत प्रति शेतकरी कुटुंबाला प्रत्येक वर्षी सहा हजार इतके अनुदान देण्यात येते. 20 एप्रिल रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. लॉगीन आयडी नंबर अ‍ॅक्टिव्ह केला जाणार आहे. या योजनेचा लाभ न घेतलेल्या शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. हातकणंगले तालुक्यातील एकूण 47 गावांपैकी सोळा गावांतील या योजनेचे काम कृषी विभागाचे कृषी सहायक हे पाहणार आहेत. 11 गावांतील तलाठी या योजनेचे कामकाज पाहणार आहेत. उर्वरित 16 गावांतील योजनेचे काम ग्रामसेवक पाहणार आहेत. यामध्ये इचलकरंजीतील अप्पर तहसीलदार विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश नाही.

अशी गावे… अशी जबाबदारी…

तलाठी यांच्याकडे असलेली अकरा गावे : नेज, लक्ष्मीवाडी, नागाव, माले, हेरले, नरंदे, भेंडवडे, मिणचे, किणी, तळसंदे, निलेवाडी

कृषी सहायक यांच्याकडे असलेली गावे : हातकणंगले, आळते, मजले, हिंगणगाव, मौजे वडगाव, हालोंडी, अंबपवाडी, कसबा वडगाव, कापूरवाडी, खोची, लाटवडे, चावरे, पाडळी, पारगाव, संभापूर, वाठार तर्फ वडगाव.

ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे असलेली गावे : कुंभोज, रूकडी, बिरदेववाडी, अतिग्रे, चोकाक, मुडशिंगी, शिरोली, अंबप, कासारवाडी, तासगाव, भादोले, वाठार तर्फ उदगाव, सावर्डे, घुणकी व मनपाडळे.

ही योजना मूळची कृषी विभागाचीच असून त्यांनीच कार्यवाही करणे गरजेचे आहे. अनेक दिवस बंद असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू ठेवण्यासाठी महसूल विभागाने पूर्णपणे मदत केली आहे; परंतु ही योजना मूळची कृषी विभागाचीच असून त्यांनीच कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसेच लॉगीन आयडी अ‍ॅक्टिव्ह कृषी विभागानेच करावा.

– कल्पना ढवळे, तहसीलदार

SCROLL FOR NEXT