कोल्हापूर

कोल्हापूर : गांधीनगरच्या अपहृत व्यापार्‍याची सुटका; चौघांना अटक

दिनेश चोरगे

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : गांधीनगर येथील भांडी विक्रीच्या घाऊक व्यापारी हरचंद्रराम पुरोहित यांचे कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील आंबवडे (ता. पन्हाळा) मार्गावरून रविवारी (दि. 7) रात्री अज्ञातांनी अपहरण केले होते. या प्रकरणी दिनेशकुमार मोबताराम पुरोहित (वय 26, रा. बाडा), ससेराराम कांतीलालजी पुरोहित (24, रा. गावरोडा), संजय कुमार नरसिराम मेघवाल (22, रा. माळवाडा) व महेंद्र रामाराम पुरोहित (27, रा. वाडा, ता. राणीवाडा, जिल्हा जालौर, राज्यस्थान) या चौघांना अटक केली. आर्थिक देवघेवीतून अपहरण झाले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पन्हाळा येथे त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

हरचंद्रराम पुरोहित हे भांड्याचे विक्री करणारे घाऊक व्यापारी असून, त्यांचे गांधीनगरमध्ये दुकान आहे. ते घाऊक दिलेल्या मालाचे पैसे आणण्यासाठी रविवारी पन्हाळा तालुक्यातील गावात आले होते; पण ते उशिरापर्यंत दुकानात परतले नाहीत. त्यांच्या मुलाने घरी चौकशी केली. तेव्हा त्याला ते रात्री आठ वाजता कोडोली गावातून बाहेर पडल्याचे समजले. घरी न परतल्याने मुलाने ते गेलेल्या रस्त्यावर वडिलांचा शोध घेतला. त्यावेळी कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील आंबवडे (ता. पन्हाळा) येथे गोल्डन पॅलेस हॉटेलजवळ त्याला वडिलांची मोटारसायकल किल्लीसह आढळली. त्याचवेळी पुरोहित यांच्या घरी रात्री गुजरात पोलिसांचा फोन आला. फोन करणार्‍या व्यक्तीने आम्ही अहमदाबाद पोलिसांतून बोलत असल्याचे सांगितले. पुरोहित यांना संशयास्पद रीतीने अज्ञात व्यक्ती एका मोटारीतून नेत असल्याचे दिसल्याने त्यांची सुटका केल्याची माहिती दिली.

तसेच त्यांना घेऊन जाण्यासाठी जवळच्या पोलिसांत फिर्याद देण्याची सूचना केली. त्यानुसार पुरोहित यांचा मुलगा दर्जाराम याने पन्हाळा पोलिसांत वडिलांचे आपहरण झाल्याची फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सलीम सनदी, पो. नाईक विलास जाधवर, बाबुलाल कोकणे, अंमलदार समीर पवार यांचे पथक अपहरण केलेल्या पुरोहित यांना आणण्यासाठी अहमदाबादकडे तातडीने रवाना झाले होते. आरटीओ चौक अहमदाबाद येथील ट्रॅफिक ठाण्यातील पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेसात वाजता पुरोहित यांना पन्हाळा पोलिसांकडे सोपवले.

अहमदाबाद पोलिसांच्या समयसूचकतेमुळेच छडा

आंबवडे येथून अपहरण केल्यानंतर हरचंद्रराम यांना आरोपी चार चाकी गाडीतून अहमदाबादमधून घेऊन जात होते. त्यावेळी अहमदाबाद येथील ट्रॅफिक ठाण्यातील पोलिसांनी त्यांच्या संशयास्पद गाडीची झाडाझडती घेतली. गाडीत बंद अवस्थेतील मोबाईल सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांना चौकशीसाठी पोलिस चौकीत आणले गेले. अधिक तपासात अपहरण केल्याचे उघडकीस आले. अहमदाबादमधील आरटीओ चौक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळेच अपहरणाचा छडा लागला.

SCROLL FOR NEXT