कोल्हापूर

khidrapur News : खिद्रापूरमध्ये एसटी चालकाच्या मनमानीमुळे वाहतूक विस्कळीत

रस्त्यात बस उभी करून वाहतुकीला केला अडथळा; ग्रामस्थांनाच केली दमदाटी

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिर परिसरात सुट्टीच्या निमित्ताने भाविक व पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असताना इचलकरंजी डेपोच्या एसटी चालकाने रस्त्यावरच एसटी बस उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. चालकाच्या या कृतीने ग्रामस्थ, वाहनचालक आणि पर्यटकांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान इचलकरंजीचे आगार व्यवस्थापक सागर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे सांगितले.

खिद्रापूर येथे सुट्टीच्या दिवशी कोपेश्वर मंदिर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक दाखल झाले आहेत. परिसरात वाहनांचीही मोठी गर्दी झाली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व पार्किंग व्यवस्थापनाचे कर्मचारी प्रयत्न करत असतानाच इचलकरंजी आगाराच्या एका एसटी बसचालकाने बस रस्त्यावरच उभी केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

पार्किंग कर्मचारी दादा मोकाशी व काही दिलीप आदुके, तोहीद जमादार या ग्रामस्थांनी चालकाला एस.टी पार्किंगमध्ये घेण्याची विनंती केली. मात्र, चालकाने त्यांचे म्हणणे ऐकून न घेता उलट संबंधितांना दमदाटी केल्याचा आरोप त्यांनी केला. "शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल करीन," अशी धमकी चालकाने दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून कर्मचारी व ग्रामस्थांनी संबंधित चालकास अधिक काही न बोलता वाहतूक सुरळीत करण्यावर भर दिला.एसटी चालकाच्या या मनमानी कारभारामुळे 2 तासाहून अधिक काळ खिद्रापूर परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दर्शनासाठी आलेल्या अनेक पर्यटकांनाही याचा फटका बसला. पर्यटक व वाहनचालकांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत संबंधित चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

खिद्रापूरमध्ये गर्दीच्या काळात वाहतूक शिस्त पाळणे आवश्यक असताना जबाबदार पदावरील व्यक्तीकडूनच अशा प्रकारे नियमांकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी आहे.अशी खंत सांगलीचे पर्यटक किशोर शिंदे यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT