Khidrapur News | खिद्रापूरात आंदोलनासाठी बसलेल्या ग्रामस्थांच्या घरांमधील मीटर बदलले!  file photo
कोल्हापूर

Khidrapur News | खिद्रापूरात आंदोलनासाठी बसलेल्या ग्रामस्थांच्या घरांमधील मीटर बदलले!

घरात कोणी नसल्याचे पाहून पाच घरांत स्मार्ट मीटर; ग्रामस्थांचा उद्रेक होताच कर्मचारी-ठेकेदारांनी काढला पळ

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथे ७१ घरांवरील कारवाईविरोधात ग्रामस्थ ठिय्या आंदोलन करत असताना, घरात कोणी नसल्याचा फायदा घेत महावितरण व स्मार्ट मीटर कंपनीच्या ठेकेदारांनी पाच घरांतील जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

पुढील घरात मीटर बसविण्याची तयारी सुरू असतानाच ही माहिती आंदोलनस्थळी मिळताच महिला व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत काम रोखले. संतप्त नागरिकांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारल्यानंतर महावितरणचे कर्मचारी व ठेकेदारांनी तेथून पळ काढल्याचा प्रकार सोमवारी घडला.

खिद्रापूरमध्ये ७१ घरांवरील कारवाईविरोधात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व युवक रात्रंदिवस आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले आहेत. याच संधीचा फायदा घेत ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्या घरांमध्ये मीटर बदलण्यात आले, त्या घरांतील महिलांनीही संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत गोंधळ घातला.

ग्रामस्थ नेते गणेश पाखरे यांनी, "स्मार्ट मीटरला राज्यभरातून विरोध असताना हक्काच्या घरांसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान घरात कोणी नसल्याचे पाहून मीटर बदलणे हा आंदोलनाचा अवमान असून अत्यंत निंदनीय प्रकार आहे," अशी प्रतिक्रिया देत हा प्रकार तातडीने थांबविण्याची मागणी केली.

ग्रामस्थांची परवानगी घेऊनच मीटर बसवले आहे, दुसऱ्या घरात बसवत असताना त्यांनी विरोध केला असून याबाबत वरिष्ठ कार्यालयात माहिती दिली आहे .
विभागीय वायरमन सूरज मुजावर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT