कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिर शिल्पकलेचा अनमोल ठेवा आहे. शिल्पकलेची साक्ष देणारे हे मंदिर आजही मजबूत असून गाभारा, स्वर्गमंडप, नंदी नसलेला सभामंडप, अप्रतिम शिल्प आणि निसर्गमय परिसरामुळे ते पर्यटकांचे नयनरम्य आकर्षण ठरणारे आहे; मात्र या मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस होऊनही प्रत्यक्ष निधी न मिळाल्याने जीर्णोद्धार रखडला आहे. हे शिल्प वैभव नष्ट झाल्यावर जीर्णोद्धार होणार का, असा सवाल आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना अर्थसंकल्पात कोपेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी 12 कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या 100 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. मार्च 2024 मध्ये 3 कोटी 46 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मंदिराच्या परिसराच्या विकासाची कामे सुरू झाली; मात्र शिल्प वैभवाच्या दुरुस्तीसाठी निधी दिलेला नाही.
ऑगस्ट 2022 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस्च्या प्रमुख शिखा जैन आणि किरण कलमदानी यांनी कोपेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीचा आराखडा तयार केला. त्याला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापक संचालक चंद्रकांत पुलकुंडवार यांना जबाबदारी देण्यात आली. तत्कालीन तहसीलदार डॉ. अपर्णा धुमाळ-मोरे, महामंडळाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक, उपअभियंता समाधान पाटील, आणि प्रकल्प सल्लागार सत्यजित चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठकीत विकासकामांचे नियोजन करण्यात आलेे. त्यानंतर त्याचे पुढे काय झाले, हे अनुत्तरितच आहे. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी इतिहासप्रेमींतून होत आहे.
खिद्रापूर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुरातत्त्व खात्याची भूमिका महत्त्वाची आहे. योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि निधी वापर यासाठी पुरातत्त्व खात्याने पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्राचीन स्थापत्य आणि शिल्पकलेचे मूळ स्वरूप अबाधित ठेवत संवर्धनाचे काम त्वरित सुरू करण्यासाठी खात्याने सक्रियता दाखवणे गरजेचे आहे.