कोल्हापूर : ज्या रंगमंचावर कित्येक कलाकारांच्या अभिनयाला झळाळी आली... विचारवंतांच्या वक्तृत्वाला धार आली, कलाकारांनी इथेच पहिलं पाऊल टाकलं, तर कौतुक अन् टाळ्यांच्या गजराने इथला कोपरा अन् कोपरा गजबजला... संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासोबत भावनांची वीण कोल्हापूरकरांच्या मनात अशा अनेक क्षणांनी गुंफलेली. केशवराव नाट्यगृह म्हणजे सांस्कृतिक ऐवज. गेल्या वर्षीची 8 ऑगस्टची रात्र या नाट्यगृहासाठी काळ बनून आली. एक ठिणगी पडली आणि बघता बघता ज्वालांनी नाट्यगृहाचा श्वास असलेले रंगमंच, प्राण असलेले सभागृह मगरमिठीत घेतले. त्या झळांनी असे काही वेढले की, हा सांस्कृतिक ऐवज जळून कोसळला. काळवंडलेल्या भिंती, जळलेले कोरीवकाम हे पाहताना कोल्हापूरकरांच्या काळजालाही चटके बसले. पण रंगकर्मींनी आशेचा किरण विझू दिला नाही. रंगकर्मींनी नाट्यगृहाच्या उभारणीसाठी केलेला पाठपुरावा, आणि सरकारची आर्थिक साथ यामुळे वर्षभरानंतर आपलं नाट्यगृह पुन्हा उभं राहतंय ही भावनाच आनंददायी आहे.
आगीच्या घटनेत केशवराव नाट्यगृहाची केवळ वास्तू जळाली नाही, तर कलाकारांचे भावविश्वच खाक झाले. त्या रात्री कोल्हापूरकरांच्या डोळ्यात अश्रू...काळजात वेदना आणि ओठांवर एकच प्रश्न होता...आपलं केशवराव नाट्यगृह पुन्हा पहिल्यासारखं कधी उभं राहिल? आगीच्या घटनेनंतर रस्त्यावरून जाताना नजर नाट्यगृहाकडे वळली की, काळजात चर्रर्र व्हायचं. शैलीदार बांधकामाच्या सौंदर्याला धरलेली ती काजळी पाहणंही रंगकर्मींना असह्य होत होतं. डोळ्यादेखत नाट्यगृह आणि खासबाग मैदानातील रंगमंच भस्मसात झाल्यानंतर शाहू महाराजांच्या कलासक्त स्वप्नाचे मूर्त रुप असलेली ही वास्तू जशी होती तशी नव्याने उभी करण्यासाठी रंगकर्मींनी जीवाचं रान केलं.
मग सुरू झाला संघर्ष. नाट्यगृहाला पुन्हा उभं करण्यासाठी. राज्यसरकारने 25 कोटींची आर्थिक मदत जाहीर केली. पण ती खात्यात जमा होईपर्यंत कोल्हापूरकरांनी रेटा लावला. जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यांच्यापर्यंत आवाज पोहोचवला. नव्याने उभारणी होत असताना कलाकारांच्याद़ृष्टीने गरजेच्या असलेल्या गोष्टी होण्यासाठी आग्रह धरला.
कोल्हापूरकर, सांस्कृतिक क्षेत्रातील रंगकर्मी, कलाकार, प्रशासकीय अधिकारी यांनी मोट बांधली. विनंत्यांची पत्रं लिहिली गेली. निवेदनं दिली गेली. प्रसंगी मोर्चा, आंदोलनांचाही आवाज वाढला. तळमळ फक्त इतकीच होती की, आगीच्या झळा लागण्यापूर्वी केशवराव नाट्यगृहाचा जो बाज होता तोच बाज नव्या रुपातही दिसला पाहिजे. आजमितीला केशवराव नाट्यगृहाचे अंतरंग जसे होते तसेच आकाराला आले आहे. रंगमंच, छत उभं राहिलं आहे. नवा रंग, नवा आवाज, आधुनिक तंत्रज्ञान, अद्ययावत प्रकाश व ध्वनीयंत्रणा...पण नाट्यगृहाचा आत्मा मात्र जुना आपलेपणाचाच आहे. कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासातील त्या काळ्या दिवसाला एक वर्ष पूर्ण होत असताना केशवराव नाट्यगृहाने पुन्हा तोच आकार घेतला आहे.
गेल्या वर्षी आगीच्या घटनेनंतर समोर आलेले चित्र मन हेलावणारे होते. जळालेल्या भिंती, कोलमडलेला रंगमंच आणि सगळीकडे पसरलेली काजळी पाहून प्रत्येक कोल्हापूरकराच्या डोळ्यांत पाणी तरळले. ‘आपलं केशवराव पुन्हा उभं राहणार का?’ हा एकच प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. कलाकारांसाठी तर हे घरच होते आणि आपल्या डोळ्यांदेखत घराची झालेली वाताहत पाहणे असह्य होते. पण याच दुःखातून नव्या संकल्पाची ज्योत पेटली. नाट्यगृह जसे होते, ‘तसंच्या तसं’ उभं करण्याचा निर्धार रंगकर्मींनी आणि कोल्हापूरकरांनी केला.
8 ऑगस्ट 2024 : केशवराव नाट्यगृह भस्मसात : तीन तास आगीचे तांडव
9 ऑगस्ट 2024 : कोल्हापूर हळहळले : पुनर्उभारणीसाठी हात सरसावले : (तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. शाहू महाराज, खा. धनंजय महाडिक,
आ. सतेज पाटील, आ. अमल महाडिक, आ. चंद्रदीप नरके, संभाजीराजे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून नाट्यगृहाची पाहणी)
9 ऑगस्ट 2024 : आम्हाला केशवराव जसंच्या तसंच पाहिजे; रंगकर्मींची मागणी
10 ऑगस्ट 2024 : आगीची चौकशी सुरू : फॉरेन्सीक पथकाने घेतले 28 नमुने
9 ऑगस्ट 2024 : केशवराव भोसले आगीची चौकशी, चार सदस्यसीय समिती स्थापन, तातडीने अहवाल देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10 ऑगस्ट 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी : (नाट्यगृह वर्षभरात उभे करण्याची ग्वाही, 25 कोटींचा आराखडा -
20 कोटी शासन व 5 कोटी विम्यातून)
11 ऑगस्ट 2024 : नाट्यगृहासाठी अतिरिक्त निधीसाठी जिल्हा नियोजन मंडळात तरतूदीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
12 ऑगस्ट : नाट्यगृह दुर्घटनेच्या सीबीआय चौकशीची खा. शाहू महाराज यांची मागणी
ऑगस्ट 2024 : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह संवर्धन समितीची निर्मिती
19 ऑगस्ट 2024 : स्ट्रक्चरल ऑडिटच्या कामाला प्रारंभ
30 ऑगस्ट 2024 : आगी प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल : (16 कोटी 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद)
3 सप्टेंबर 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख खा. शरद पवार यांच्याकडून 1 कोटी रुपयांचा निधी जाहीर
30 सप्टेंबर 2024 : स्ट्रक्चरल ऑडिटचे सादरीकरण
2 ऑक्टोबर 2024 : नाट्यगृह पुनर्बांधणीची निविदा प्रसिद्ध
10 ऑक्टोबर 2024 : केशवराव भोसले नाट्यगृह रिस्टोरेशनसाठी 3 निविदा
ऑक्टोबर 2024 : 25 कोटी रुपयांच्या कामास प्रारंभ (रिस्टोरेशन, नवे रुफकाम)
14 ऑक्टोबर 2024 : नाट्यगृह इमारत रिस्टोरेशन भूमिपूजन
14 ऑक्टोबर 2024 : दुसर्या टप्प्याच्या इस्टिमेटचे काम सुरू
31 ऑक्टोबर 2014 : नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात
8 नोव्हेंबर 2024 : नाट्यगृहाचे छप्पर उतरवले
जानेवारी 2025 : नाट्यागृहाच्या छताचे काम अंतिम टप्प्यात
फेब्रुवारी 2025 : दुसर्या टप्प्यातील कामांची निविदा
एप्रिल 2025 : तिसर्या टप्प्यातील कामांना मंजुरी (11 कोटी 77 लाखांची निविदा)