केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या भीषण आगीने रौद्र रूप धारण केले.  Pudhari Photo
कोल्हापूर

केशवराव भोसले नाट्यगृह भस्मसात; नेमकं काय घडलं !

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा: कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा मानदंड असणारे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या इमारतीला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच या भीषण दुर्घटनेत नाट्यगृह जळून भस्मसात झाले. कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, तीन तासांहून अधिक काळ जळत राहिलेल्या या नाट्यगृहाच्या दगडी बांधकामाचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली. शहराचा सांस्कृतिक वारसा डोळ्यासमोर जळाल्याने कलाप्रेमींसह शहरवासियांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Keshavrao Bhosale Natyagruha)

Summary

  • केशवराव भोसले नाट्यगृह भस्मसात

  • • आता उरला केवळ दगडी सांगाडा; नाट्यप्रेमींसह कोल्हापूरकर हळहळले

  • • सर्वप्रथम खासबाग मैदानाच्या स्टेजवरील वीज मीटर बॉक्स जळाले

  • • संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच दुर्घटना

केशवराव भोसले यांची शुक्रवारी जयंती

केशवराव भोसले यांची शुक्रवारी जयंती आहे. त्यानिमित्त सकाळी ९ वाजता कार्यक्रम होणार होते. त्याची सर्व तयारी करून नाटयगृह बंद करून कर्मचारी रात्री सव्वा आठ वाजता बाहेर पडले. यानंतर साडेनऊच्या सुमारास नाट्यगृहाच्या पाठीमागे असलेल्या खासबाग मैदानाच्या स्टेजवरील वीज मीटर बॉक्समध्ये आग लागली. या आगीच्या ठिणग्या खाली पडल्या. या ठिकाणी असलेले मॅट, कापडी फलक, लाकडी साहित्य आदींनी क्षणार्धात पेट घेतला. (Keshavrao Bhosale Natyagruha)

आग  नाट्यगृहाच्या मुख्य इमारतीत शिरली.

दरम्यान, नाट्य गृहाच्या पाठीमागे असलेल्या स्टेजला लागलेल्या आगीने बाजूला असलेल्या वातानुकुलित यंत्रणेच्या साहित्याला घेरले. दुसऱ्या मिनिटालाच या यंत्रणेचा मोठा आवाज होत स्फोट झाला. या स्फोटाने आगीच्या ठिणग्या दूरवर उडाल्या. यामुळे आग आणखी पसरत नाट्यगृहाच्या मुख्य इमारतीत शिरली. आणि पाहता पाहता आगीने अख्ख्या इमारतीला आपल्या कवेत घेतले. (Keshavrao Bhosale Natyagruha)

एका पाठोपाठ स्फोट

आग वाढत चालली होती. अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, आग मुख्य इमारतीत पसरत गेली. तसे इमारतीतील एसीचे एकापाठोपाठ स्फोट होऊ लागले. स्फोटाने आगीचे लोळ नाट्यगृहाच्या खिडकी, दरवाजातून बाहेर येऊ लागले. वातानुकुलित यंत्रणेबरोबरच जनरेटरचाही स्फोट झाला. त्यामुळे आग आणखी भडकली. आगीच्य ज्वाला आणि धूर काही अंतरावरूनही दिसत होते. त्यातच जळत असलेल्या लाकडाच्या ठिणग्या आकाशात ५० ते १०० फुटांपेक्षा अधिक उंच उडत होत्या. (Keshavrao Bhosale Natyagruha)

अन् बघता बघता आगीने केले रौद्र रूप धारण

आग नाट्यगृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या स्टेजला लागली.त्यानंतर ती त्यामागे असलेल्या लाकडी जिन्याला लागली. तेथून ती मुख्य इमारतीच्या छतापर्यंत गेली. आणि बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. छताला असलेले लाकूड, आसनासाठी वापरलेले कुशन, पडदे, फोम, लाकडी कलाकुसर आदींने आग अधिकच भडकत गेली. (Keshavrao Bhosale Natyagruha)

मदत कार्यात अडचण

अग्निशमनचे बंब इमारतीसमोर नेण्यात अनेक अडचणी येत होत्या. मुख्य प्रवेशाद्वारासमोर असलेला मंडप प्रवेशद्वाराची उंची आणि रूंदी आणि पुढे -मागे असणारे बंब यामुळे आग विझविण्यात अडचणी येत होत्या. आगीची भीषणता अधिक असल्याने तत्काळ परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला.

पोलिसांचा सौम्य लाठीमार

आग लागलेली कळताच बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. खासबाग मैदानात मोठ्या प्रमाणात लोक, महिला, लहान मुले होती. आगीच्या ठिणग्या पडत होत्या. स्फोट होत होते. यामुळे वारंवार सांगूनही नागरिक दूर होत नव्हते. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामुळे मैदानात पळापळ झाली. मैदानातील मिरजकर तिकटीच्या दिशेला असलेल्या प्रवेशद्वाराकडे लोक पळाले. पण ते बंद होते. यामुळे पुन्हा लोक खासबागच्या केएमटी बस थांब्याकडील प्रवेशद्वाराजवळ आले. पोलिसांनी सर्वांना बाहेर काढून मैदान मोकळे केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT