Keshavrao Bhosale Theatre ARJUNDTAKALKAR
कोल्हापूर

Keshavrao Bhosale Theatre : केशवराव भोसले नाट्यगृह जळाले की जाळले?

फॉरेन्सिक अहवालात घटनास्थळी पेट्रोलचे अंश आढळल्‍याने भुवया उंचावल्या

पुढारी वृत्तसेवा

अनुराधा कदम

कोल्हापूर : कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा अशी ओळख असलेल्या, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेबाबत गेल्या पावणेदोन वर्षापासून साशंकता असतानाच, आता हे नाट्यगृह जळाले की जाळले? असा प्रश्न रंगकर्मींसह शहरवासीयांना पडला आहे. याला कारण ठरले आहे फॉरेन्सिक अहवालातील धक्कादायक निष्कर्ष. एक वर्षापूर्वी पोलिसांना मिळालेला आणि अद्याप उघड न झालेल्या या अहवालात घटनास्थळी पेट्रोलचे कॅन, पेट्रोलचे पडलेले डाग यासह ज्वालाग्रही पदार्थ आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहे, असे महापालिका विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी सांगितले.

कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची साक्ष देणारे केशवराव भोसले नाट्यगृह ८ ऑगस्ट २०२४ रोजी जळून खाक झाले होते. यामध्ये १६ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाले. या दुर्घटनेला दोन वर्षे होत आली, तरी ही आग कशी लागली, त्यामागचे कारण काय याचा उलगडा करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

२८ नमुन्यांपैकी ३ नमुने ठरले संशयास्पद

आग लागल्यानंतर फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपासासाठी तब्बल २८ नमुने संकलित केले होते. त्यापैकी ३ नमुन्यांच्या पाहणीतून आग भडकण्यास कारणीभूत ठरणाऱ्या साहित्याबाबत निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. फॉरेन्सिक लॅबचा अंतिम अहवाल एक वर्षापूर्वी, ५ जुलै २०२५ रोजी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. लाटकर यांनी हा अहवाल माहितीच्‍या अधिकारात मागवला आहे.

नाट्यगृह जळीत प्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना वर्षभरापूर्वी मिळूनही त्याआधारे संबंधित साहित्य नाट्यगृहाच्या परिसरात कसे आले, ते कोणी आणले, तसेच त्या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयास्पद बाबी आढळल्या होत्या का, याचा सखोल तपास अद्याप झालेला नाही.
- राजेश लाटकर, विरोधी पक्षनेते, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT