कोल्हापूर ः रिस्टोरेशन, नवे रुफकाम आणि सजावटीची कामे झाल्यानंतर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असे आणखी खुलून दिसणार आहे.  
कोल्हापूर

केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभे राहणार

25 कोटींची कामे सुरू ः रिस्टोरेशन, नवे रुफकाम, दुसर्‍या टप्यात गॅलरी, सजावटीची कामे

पुढारी वृत्तसेवा
डॅनियल काळे

कोल्हापूर ः संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जसेच्या तसे करण्यासाठी मिळालेल्या 25 कोटी रुपयांच्या निधीतून कामांना सुरुवात झाली आहे. कामाचे एकूण चार टप्पे केले असून पहिल्या टप्यात नवे रुफकाम आणि भिंतीचे रिस्टोरेशन केले जात आहे. भिंतीच्या रिस्टोरेशनचे काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरू असून नव्या रुफकामाला आता सुरुवात होणार आहे. त्यासाठी लोखंडी कैच्या बसविण्याचे काम सुरू आहे. ही सर्व कामे येत्या काही महिन्यांत पूर्ण होणार असून नाट्यगृह पुन्हा नव्या दिमाखात उभे राहणार आहे.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला 8 ऑगस्ट 2024 रोजी रात्री अचानक आग लागली. या आगीमध्ये नाट्यगृह जळून खाक झाले. नाट्यगृहाचे रुफकाम, स्टेज, खुर्च्या, साऊंड सिस्टीम जळून खाक झाले. अख्खे कोल्हापूर हळहळले तसेच राज्यभरातील नाट्यकर्मींचे डोळेदेखील पानावले होते. नाट्यगृह पुन्हा जसेच्या तसे उभे करण्याच्या घोषणा करण्यात आल्या. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्यगृहाला भेटी देऊन पाहणी केली. नाट्यगृह जसेच्या तसे उभे करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 25 कोटींचा निधी जाहीर केला आणि निवडणूक आचारसंहिता होण्यापूर्वी हा निधी महापालिकेच्या खात्यावरदेखील जमा झाला आहे.

हे नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभे करण्यासाठी दर्जेदार कंपन्याचीही निवड करण्यात आली. जगभरातील अनेक ऐतिहासिक वास्तूंचे काम करण्याचा अनुभव असणार्‍या स्टक्टवेल कंपनीची तांत्रिक सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सध्या नाट्यगृहाचे काम सुरू आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ऑक्टोबर 2024 पासून या कामांना सुरुवात झाली आहे. सध्या भिंतीचे रिस्टोरेशन सुरू आहे. गिलावा मारण्याचे काम सुरू आहे. नवीन रुफकाम करण्यासाठी छताच्या लोखंडी कैच्या बनविल्या जात आहेत.

असे आहेत चार टप्पे

पहिला टप्या- 7 कोटी ः नवे रुफकाम, एक मीटरने भिंती उतरून रिस्टोरेशन

दुसरा टप्पा - 3 कोटी 20 लाख ः इंटेरियर,

अंतर्गत रंगसंगती, सजावट व खुर्च्यांची रचना

तिसरा टप्पा - स्टेज, लाईटकाम, वातानुकूलित यंत्रणा

चौथा टप्पा - रस्ते, पाणी व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन व इतर कामे

160 चारचाकींचे स्वतंत्र पार्किंग

नाट्यगृहासाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था असणार आहे. यामध्ये 160 चारचाकी वाहने आणि 266 दुचाकी वाहने पार्क करता येणार आहेत. त्यामुळे पार्किंगची समस्या दूर होणार आहे. त्याचबरोबर अत्यंत चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहेदेखील बांधण्यात येणार आहेत.

लिव्हिंग रूम आणि नवे स्वतंत्र कलादालन

नाट्यगृहासाठी एकूण चार प्रशस्त लिव्हिंग रूम तयार केल्या जाणार आहेत. कलाकारांसाठी या लिव्हिंग रूमचा वापर केला जाणार आहे. त्यासोबत पार्किंगच्या जागी नवे कलादालन बांधले जाणार आहे.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम गतीने करण्यासोबतच त्याचा दर्जा उत्कृष्ट राहील याद़ृष्टीने सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. नाट्यगृहाची मूळ इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे अखंडपणे काम सुरू आहे.
नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT