Keshavrav Bhosale Natyagruha | ‘केशवराव’ जळीतकांडाची फाईल पुन्हा उघडणार : जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल 
कोल्हापूर

Keshavrav Bhosale Natyagruha | ‘केशवराव’ जळीतकांडाची फाईल पुन्हा उघडणार : जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल

सीआयडी किंवा एसआयटी पथकाद्वारे चौकशीची महाविकास आघाडीतर्फे मागणी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ८ ऑगस्ट २०२४ रोजी आग लागली. त्या दिवशी घटनास्थळी पेट्रोलचे अंश, तसेच ज्वालाग्रही साहित्य आढळून आल्याचे फॉरेन्सिकच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या अहवालातील निष्कर्षांच्या आधारे आजअखेरच्या पंचनाम्याची माहिती घेऊन नाट्यगृहाच्या जळीतकांडाची तपास फाईल पुन्हा उघडणार असल्याचे जिल्हा पोलिसप्रमुख नीलोत्पल यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

फॉरेन्सिक अहवालातील नोंदीनुसार या प्रकरणाची नव्याने चौकशी करावी, या मागणीचे निवेदन शुक्रवारी (दि. ३१) महाविकास आघाडीतर्फे नीलोत्पल यांना देण्यात आले. फॉरेन्सिक अहवालामुळे आगीच्या कारणांबाबत गंभीर मुद्दे उपस्थित झाले आहेत. या घटनेकडे केवळ अपघात म्हणून न पाहता तपासाचा वेग वाढवून दोषींवर कठोर कारवाई करावी. तपासात पारदर्शकता यावी, यासाठी सीआयडी किंवा एसआयटी पथक नेमावे, तसेच तपासातील माहिती सार्वजनिक करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. याप्रसंगी चर्चेदरम्यान नीलोत्पल यांनी तपास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, अशी ग्वाही दिली. यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, ठाकरे सेना गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह नगरसेवकांचा शिष्टमंडळात समावेश होता.

नीलोत्पल म्हणाले, दोन वर्षांतील पंचनामा, प्राथमिक तपास याची पूर्वमाहिती घेतली जाईल. तसेच, घटनेदरम्यानच्या कालावधीतील मोबाईल टॉवर, डम्प डेटा, कॉल डिटेल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज, अन्य डिजिटल पुरावे यांचे वैज्ञानिक विश्लेषण करून आगीचे नेमके कारण काय, तसेच ही आग सहेतूक लावली असेल, तर त्याचा सखोल तपास करण्यासाठी फाईलमधील सर्व तपशील पुन्हा उघडले जातील.

पुन्हा चक्रे फिरणार

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या जळीत प्रकरणाचा तपास ऑगस्ट २०२४ पासून सुरू असून, पंचनाम्यात परिस्थितीजन्य पुरावे, तसेच साक्षीदार तपासण्यात आले आहेत. जुलै २०२५ मध्‍ये फॉरेन्सिक लॅबचा अहवाल येऊनही अद्याप तपासाला गती आलेली नाही. मात्र, आता नीलोत्पल यांनी या प्रकरणाबाबत केलेल्या विधानामुळे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आग प्रकरणाच्या तपासाची चक्रे पुन्हा फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT