कोल्हापूर

समन्वय ठेवा; पूरस्थिती टाळा

Arun Patil

नृसिंहवाडी, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांत महापुराच्या पार्श्वभूमीवर समन्वय ठेवावा, कोयना ते अलमट्टी दरम्यान येणार्‍या धरणांतून पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवावे, अशा मुख्य मागण्या रविवारी नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे झालेल्या पूर परिषदेत करण्यात आल्या.

जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास महापुराचे संकट टळू शकते, असे प्रतिपादन पाटबंधारे विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एम. के. कुलकर्णी यांनी यावेळी केले.

आंदोलन अंकुश, कृष्णा महापूर नियंत्रण समिती व स्पंदन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी परिषद विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी जल अभ्यासक विजयकुमार दिवाण होते; तर कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी विविध दहा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

रविवारी दुपारी तीन वाजता पूर परिषदेला प्रारंभ झाला. आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलकर्णी पुढे म्हणाले, जून-जुलै महिन्यात केंद्रीय जल परिचलनानुसार कोयना ते अलमट्टी मार्गावरील कोणत्या धरणात किती पाणी ठेवावे, किती पाण्याचे विसर्ग करावे, या जल परिचलनानुसार पूर्णपणे अंमलबजावणी केल्यास पुराचा धोका टाळण्यासाठी मदत होईल. जल अभ्यासक दिवाण म्हणाले, कर्नाटकातील अलमट्टी धरणाबरोबर हिप्परगी बॅरेज (बंधारा) ही या महापुरासाठी कारणीभूत आहे. यासाठी कोल्हापूर बंधार्‍याच्या धर्तीवर हिप्परगी धरणाचे दरवाजे तळातून काढावेत व नवीन अद्ययावत पद्धतीने ते तयार करावेत.

या पूर परिषदेत दहा ठराव करण्यात आले. त्याला दीपक पाटील व राकेश जगदाळे यांनी अनुमोदन दिले. प्रदीप वायचळ, दत्ता उथळे, सर्जेराव पाटील, प्रभाकर केंगार, प्रा. बाळ संकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी दर्शन वडेर, सत्यजित सोमण, दत्तात्रय जगदाळे, महेश जाधव, भूषण गंगावणे, रशीद मुल्ला, द्वारकानाथ जाधव, दादा गवळी, नंदू कदम, जितेंद्र चौगुले, हेमंत बाहुलेकर, आशाराणी पाटील, एकनाथ माने, बशीर फकीर, महावीर कुंभोजे, जयपाल उगारे, आण्णासो आणुजे यांच्यासह अनेक मान्यवर पूर परिषदेला उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT