कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या फरकापोटीचा तिसरा व अंतिम हप्ता देण्याचा निर्णय बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. १२ कोटी ७७ लाख रुपयांची ही रक्कम लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगार खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
केडीसीसी बँकेने १६ सप्टेंबर २०२४ रोजी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला होता. बँक व्यवस्थापन आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन तसेच बँक एम्प्लॉईज युनियन यांच्यात झालेल्या करारानुसार ही वेतनवाढ १ एप्रिल २०१७ पासून लागू करण्यात आली. वेतनवाढीच्या फरकापोटी मागील ८८ महिन्यांची सुमारे ४० कोटी रुपयांची रक्कम बँकेच्या नफ्यातून तरतूद करून कर्मचाऱ्यांना देण्याचे निश्चित करण्यात आले होते.
करारानुसार पहिल्या हप्त्यापोटी १५ कोटी १३ लाख रुपये २५ ऑक्टोबर २०२४ रोजी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या हप्त्याची १२ कोटी ७७ लाख रुपयांची रक्कम २० ऑगस्ट २०२५ रोजी वर्ग करण्यात आली. आता उर्वरित १२ कोटी ७७ लाख रुपयांचा तिसरा व अंतिम हप्ता देण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांनी ठेवी, व्यवसायवाढीसाठी प्रयत्न करावेत
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गणेश चतुर्थीपूर्वी वेतनवाढ फरकाचा तिसरा आणि अंतिम हप्ताही कर्मचाऱ्यांना देता आला, याचे संचालक मंडळाला समाधान आहे. बँकेने चांगली प्रगती केली असून, बँक ज्या परिस्थितीतून गेली त्यावर मात करण्याची शक्ती शेतकऱ्यांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांनी बँकेच्या, पर्यायाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अहोरात्र काम करावे. विशेषतः ठेवी आणि व्यवसायवाढीसाठी झोकून देऊन प्रयत्न करावेत.