कोल्हापूर : कावळा नाका परिसरातील सेव्हंथ डे स्कूल परिसरात पाईपलाईनला शुक्रवारी रात्री अचानक गळती लागली. यामुळे सुमारे फूटभर पाणी रस्त्यावरून वाहत होते. या परिसरातील आयोध्या पार्कमधील सखल भागात गळतीचे पाणी घुसले. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. दरम्यान, रहदारीच्या रस्त्यावर गर्दीच्या वेळी पाईपलाईन फुटून पाणी वाहू लागल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. पाण्यातून संथ गतीने लोकांना वाहन चालवावे लागल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कावळा नाका ते टेंबलाई उड्डाणपूल या रस्त्यावर पाण्याच्या पाईप लाईनला अचानक गळती लागली. मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहू लागले. पाणी वाहून सखलात असणार्या आयोध्या पार्क संकुलातील पार्किंग एरियात घुसले. पाण्याच्या गळतीमुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याने गळतीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी बॅरिकेड लावले. रात्री 9 वाजले तरी गळती सुरूच होती. तीन-चार तासांचा कालावधी लोटला, तरी महापालिका यंत्रणा गळतीच्या ठिकाणी दाखल झाली नव्हती. याबद्दल स्थानिक नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.