कसबा बावडा : कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर समाजात वेगळी ओळख निर्माण केलेल्या संतोष आणि ॲड. वंदना गायकवाड यांचा अपघाती मृत्यू झाल्याने कसबा बावडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दाम्पत्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संसार उभा केला होता. त्यांना एक मुलगा व एक लहान मुलगी आहे. ही दोन्ही मुले आता पोरकी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अपघाताची माहिती मिळताच संतोष यांचे मित्र घटनास्थळाकडे धावले. कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनानंतर त्यांचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातामुळे दोन्ही मुले पोरकी झाली.
अपघातस्थळाचे दृष्य भयावह
अपघातस्थळाचे दृष्य भयावह होते. मोटारीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. महामार्ग पोलिस उपनिरीक्षक अनिल सावळे, उपनिरीक्षक अरुण पाटील, पोलिस कर्मचारी महेश पौटे व श्रीकांत थोरात तसेच कवठेमहांकाळ पोलिसांनी पंचनामा करून मदतकार्य सुरू केले. मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या अपघाताने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भरधाव वेग, रस्त्याच्या कडेला निष्काळजीपणे उभी असलेली वाहने आणि अपुऱ्या दक्षतेमुळे निरपराध जीवांना प्राण गमवावे लागत आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी होणे आणि वाहनचालकांनीही अधिक जबाबदारीने वाहन चालविणे गरजेचे असल्याच्या भावना घटनास्थळी उपस्थित लोकांमधून व्यक्त झाल्या.