​kasari dam | कासारी धरणात केवळ २२ टक्के पाणीसाठा! ६१ गावांची चिंता वाढली 
कोल्हापूर

​kasari dam | कासारी धरणात केवळ २२ टक्के पाणीसाठा! ६१ गावांची चिंता वाढली

कडक उन्हाचा फटका : बाष्पीभवन वाढले, धरण क्षेत्रात पाऊस गायब

पुढारी वृत्तसेवा

सुभाष पाटील

विशाळगड : यंदा पडलेल्या कडक उन्हाचा आणि वाढत्या तापमानाचा थेट फटका शाहूवाडी तालुक्यातील 'कासारी मध्यम प्रकल्पाला' बसला आहे. धरणातील पाणीपातळी कमालीची घटली असून सध्या केवळ ०.६२ टीएमसी म्हणजेच २२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण क्षेत्रात पावसानेही दडी मारल्यामुळे चिंतेचे ढग गडद झाले असून, पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

​कासारी धरणावर शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील सुमारे ६१ गावांची तहान आणि सिंचन अवलंबून आहे. दरवर्षी १५ जूनपर्यंत पाणी पुरविण्याचे नियोजन केले जाते, मात्र यंदा उन्हाची तीव्रता खूपच जास्त असल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले आहे.

पावसाची ओढ; गतवर्षीपेक्षा साठा कमी

​गेल्या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला धरणात ०.८४ टीएमसी (३० टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा मात्र त्यात ८ टक्क्यांची घट झाली आहे. पावसाचा विचार केल्यास, गतवर्षी ८ जूनपर्यंत धरण क्षेत्रात ७५ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर यंदा अवघा ० मिमी पाऊस झाला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे धरणातील आवक पूर्णपणे थांबली आहे.

कासारी नदीवर टप्प्याटप्प्याने उपसा बंदी

​धरणातून वीज निर्मितीसाठी दररोज २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे, कासारी नदीतून सिंचनासाठी सोडले जाणारे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पाणी मिळावे यासाठी प्रशासनाने कासारी नदीवर टप्प्याटप्प्याने उपसा बंदी लागू केली आहे.

​​​​लघु प्रकल्पांची स्थितीही चिंताजनक

​पोंबरे: ३२ टक्के

​कुंभवडे: २९ टक्के

​पडसाळी: २५.४७ टक्के

​केसरकरवाडी: २३.६५ टक्के

​नांदारी: १९.७० टक्के

​'ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरवण्याचे नियोजन' ​"धरणाची पाणी साठवण क्षमता २.७७ टीएमसी असून सध्या धरणात ०.६२ टीएमसी साठा आहे. पाणी कमी असले तरी ऑगस्ट अखेरपर्यंत सर्वांना पाणी पुरेल अशा पद्धतीने पाटबंधारे विभागाने नियोजन केले आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी दक्षता म्हणून पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा."
— सचिन लाड (शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT